कर्जतजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दगडफेक, एक प्रवासी जखमी; अल्पवयीन आरोपीला वांगणीतून घेतले ताब्यात

कर्जतजवळ धावत्या हुबळी एक्स्प्रेसवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात बेळगावमधील प्रवासी जखमी झाला असून त्याच्यावर साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तौसिफ हतरवाड (१९) असे या जखमी प्रवाशाचे नाव असून तो हुबळी एक्स्प्रेसने बेळगावला जात होता. दरम्यान या घटनेबाबत तक्रार दाखल होताच कर्जत रेल्वे पोलिसांनी सूत्र हलवत वांगणी परिसरातून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

जखमी प्रवासी तौसिफवर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र धावत्या लोकलवर दगडफेक झाल्याची तक्रार प्राप्त होताच कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पथक नेमले. या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब कुरुंद, प्रवीण कड, पोलीस शिपाई चोरमले, निकेश तुरडे व हर्षल सेलोटे यांनी वांगणीच्या ट्रॅकशेजारी असलेल्या परिसरात शोध घेतला असता १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने ही दगडफेक केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलि सांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असता बाल न्यायालयात हजर केले.

दोषारोपपत्र सादर करणार

कर्जत रेल्वे पोलिसांनी अल्पवयीन हल्लेखोर मुलाविरोधात दोषारोपपत्र सादर करण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी प्रवा-शांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि इतर तपास कागदपत्रे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांनी दिली.