पाणीटंचाईविरोधात शिवसेनेसह महाविकास आघाडी रस्त्यावर, ऐन दिवाळीत पनवेलकरांची घागर उताणी

सिडकोच्या गलथान कारभारामुळे पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोली विभागात अक्षरशः ‘पाणीबाणी’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसात तर पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून रहिवाशांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मात्र त्यानंतरही सिडको प्रशासन ढिम्म असल्याने ऐन दिवाळीत पनवेलकरांची घागर उताणीच राहिली आहे. याविरोधात शिवसेना, काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी रस्त्यावर उतरत सिडकोच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. कळंबोली ते सिडको कार्यालय असा निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेत प्रशासनाचा निषेध केला.

कळंबोलीतील अनेक भागांमध्ये अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने तेथील नागरिकांना टैंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असताना पाण्याच्या समस्येने नागरिकांचे हाल होत आहेत. ऐन दिवाळीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र त्यानंतरही प्रशासन कानाडोळा करत आहे. याविरोधात महाविकास आघाडीने पुढाकार घेत सिडकोवर धडक दिली. कळंबोली बस डेपो येथून सुरू झालेला हा मोर्चा सेक्टर १६ गुरुद्वारा, कार्मेल स्कूल चौक, स्टेट बँकमार्गे सिडको कार्यालयावर धडकला.

कळंबोलीतील पाण्याची समस्या अधिक गंभीर बनली असून, ही समस्या तत्काळ सोडवावी. तसेच सणासुदीच्या काळात त्यावर उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन छेडले जाईल. – बबन पाटील, शिवसेना उपनेते

तत्काळ उपाययोजना करा, अन्यथा धडा शिकवू !

सिडकोवर धडकलेला मोर्चा पाहून अधिकाऱ्यांची अक्षरश: तंतरली. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत तत्काळ उपाययोजना करा, अन्यथा प्रशासनाला धडा शिकवू, असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबन पाटील, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हरेश केणी, प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, मनसे महानगरप्रमुख योगेश चिले, शरद पवार गटाचे तुषार पाटील, समाजसेवक बुधाजी ठाकूर, शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, शिवसेना शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर, शिवसेना वाहतूक सेनेचे महेश गुरव, माजी नगरसेविका शशिकला सिंह, माजी नगरसेवक गोपाळ भगत, सपा अध्यक्ष अनिल नाईक, हेमराज म्हात्रे, नौफिल सय्यद, कृष्णा कदम, राहुल चव्हाण, प्रकाश म्हात्रे, दीपक पाटील, ज्योती मोहिते, जयश्री खटकल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.