
जागतिक हवाई दलाच्या पॉवरफुल यादीत हिंदुस्थानला तिसरा, तर चीनला चौथा क्रमांक मिळाल्याने चीनने आगपाखड केली आहे. ही रँकिंग बिनकामाची आहे, असे सांगत चिनी सरकारी माध्यमांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. हवाई दलाची रँकिंग ही कागदावर नव्हे तर त्या हवाई दलाच्या क्षमतेवर अवलंबून असायला हवे, असेही चीनने म्हटले आहे. या क्रमवारीत अमेरिका पहिल्या स्थानावर, रशिया दुसऱ्या स्थानावर आहे. हिंदुस्थानला तिसरे स्थान मिळाले असून चीन चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे. त्यामुळे चीनने संताप व्यक्त केला आहे. वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्टद्वारे ही क्रमवारी संकलित करण्यात आली होती, ज्यामध्ये 103 देश आणि 129 हवाई सेवा (सैन्य, नौदल आणि सागरी विमान वाहतूक शाखा) समाविष्ट होत्या.
हिंदुस्थानला चीनपेक्षा पाच गुण जास्त मिळाल्याने हिंदुस्थान चीनच्या पुढे गेला आहे. या रँकिंगमध्ये टवल रेटिंगचा वापर केला जातो. जो केवळ विमानांच्या संख्येवरच नाही तर त्यांची गुणवत्ता, आधुनिकीकरण, लॉजिस्टिक सपोर्ट, हल्ला आणि संरक्षण क्षमतांवरदेखील आधारित असतो. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने चिनी लष्करी तज्ञ झांग जुनशे यांचे म्हणणे छापले आहे. त्यांच्या मते, हवाई दलाच्या या रँकिंगला गांभीर्याने घेऊ नये. केवळ प्रत्यक्ष लढाऊ क्षमताच सैन्याची खरी ताकद दर्शवते, कागदावरचे आकडे नाही, असे ते म्हणाले. अमेरिका आणि भारतीय माध्यमांनी केलेला प्रचार चीन-भारत स्पर्धेला चालना देण्यासाठी असू शकतो आणि त्यामुळे गैरसमजांची धोकादायक साखळी निर्माण होऊ शकते, असेही झांक म्हणाले.