जपानला मिळाली पहिली महिला पंतप्रधान, साने ताकाइचीने रचला इतिहास

जपानच्या संसदेने साने ताकाइची यांना देशाची पहिली महिला पंतप्रधान म्हणून निवडले आहे. साने यांनी जपानमध्ये इतिहास रचला आहे. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख असलेल्या 64 वर्षीय ताकाइची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. त्या शिगेरू इशिबा यांची जागा घेतील. निवडणुकीत पराभव झाल्यामुळे शिगेरू यांना राजीनामा द्यावा लागला होता. आज जपानच्या खालच्या सभागृहात साने ताकाइची यांना 465 मतांपैकी 237 मते मिळाली आहेत. ही मते बहुमतापेक्षा अधिक आहेत.

जपानच्या नवनिर्वाचित पंतप्रधान ताकाइची यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मी जनतेला जी काही आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सर्व जण ऐक्य दाखवून पुन्हा एकदा पुनर्निर्माण करू शकतो. त्यामुळे सर्वांना काम करण्याची विनंती करते. आपण सर्वांनी घोड्याप्रमाणे चपळाईने काम करायला हवे. मी स्वतःला वर्क लाइफ बॅलन्सपासून मुक्त करणार आहे. मी काम करणार, मी काम करणार, मी काम करणार आणि मी फक्त काम करणार आहे, असे त्या या वेळी म्हणाल्या. ताकाइची यांना जपानची आर्यन लेडी म्हणूनही संबोधले जाते. त्यांना जपानच्या संसदेत सदस्य म्हणून तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी याआधी आर्थिक सुरक्षा मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

साने ताकाइची यांचा जन्म 7 मार्च 1961 रोजी जपानच्या नारा राज्यात झाला. त्यांचे वडील टोयोटा कंपनीत एक साधे कर्मचारी होते, तर आई पोलीस म्हणून कार्यरत होती. ताकाइची यांनी कोबे विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी टीव्ही अँकर म्हणूनही काम केले. 1996 पासून त्या संसद सदस्य आहेत. आता त्या जपानच्या पंतप्रधान झाल्या आहेत.