चहावाल्याकडे सापडली 1 कोटींची रोकड

बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बिहार पोलिसांना गोपालगंजमध्ये एका चहा विक्रेत्याच्या घरात तब्बल 1 कोटी 5 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. हा चहावाला आंतरराज्यीय सायबर गुन्हे नेटवर्कमध्ये सहभागी असून पोलिसांनी त्याच्या दोन भावानांही या गुह्याप्रकरणी अटक केली आहे.पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर अमैठी खुर्द गावातील घरावर धाड टाकली.

या धाडीत पोलिसांना 1 कोटी 5 लाख 49 हजार 850 रुपये रोख मिळाले. 344 ग्रॅम सोने, 1.75 किलोग्रॅम चांदी, ऑनलाईन गुह्यातील काही कागदपत्रे सापडली. पोलिसांनी हे सर्व जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्यांमध्ये 85 एटीएम कार्ड, 75 बँक पासबुक, 28 चेकबुक, आधार कार्ड, दोन लॅपटॉप, तीन मोबाइल फोन आणि एका लक्झरी कारचा समावेश आहे. यातील मुख्य आरोपी अभिषेक कुमार हा सायबर गुह्यात सहभागी होण्याआधी एक छोटी चहाची टपरी चालवत होता, असे पोलिसांनी सांगितले.

चहाची टपरी चालवून जास्त पैसे मिळत नसल्याने तो दुबईला गेला. तेथून त्याने आर्थिक फसवणूक करण्यास सुरुवात केली. मिळालेले पैसे अनेक बँक खात्यात ट्रान्सफर केले. पोलिसांना संशय आहे की, हे नेटवर्क बिहारबाहेरही पसरलेले आहे. जप्त करण्यात आलेले पासबूक हे बंगळुरूमधून जारी करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या अभिषेक कुमार आणि आदित्य कुमार या दोघांचीही चौकशी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.