
गेल्या दहा वर्षांपासून ओसी, फायर सेफ्टी सर्टिफिकेट घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या बिल्डरला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. फायर सेफ्टी सर्टिफिकेट घेईपर्यंत दिवसाला 50 हजारांचा दंड न्यायालयाने या बिल्डरला ठोठावला आहे.
कांदिवलीतील गौरव पॅलेसचे बांधकाम करणाऱ्या रवी फाउंडेशन, केतन शहा व जयेश शहा यांना न्यायालयाने हा दंड ठोठावला आहे. येथील सी विंगला गेल्या दहा वर्षांपासून ओसी मिळालेली नाही. फायर सेफ्टी सर्टिफिकेट न मिळाल्याने ओसी रखडली आहे. यामुळे न्या. रवींद्र घुगे व न्या. अश्विन भोबे यांचे खंडपीठ बांधकाम व्यावसायिकावर संतप्त झाले.
दंडाची रक्कम खरे तर रहिवाशांना मिळायला हवी. ओसी नसल्याने सोसायटी स्थापन झालेली नाही. परिणामी तोपर्यंत दंडाची रक्कम बिल्डरने महापालिकेत जमा करावी. सोसायटी स्थापन झाल्यानंतर पालिकेने दंडाची रक्कम त्यांना द्यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
रहिवाशांच्या जिवाशी खेळ
गेली दहा वर्षे बांधकाम व्यावसायिक येथील रहिवाशांच्या जिवाशी खेळत आहे. ओसी नसल्याने येथील रहिवाशांना न्यायालयाचे दार ठोठवावे लागले. येथे अद्याप अग्निरोधक यंत्र बसवले गेले नाही. सुदैवाने इतक्या वर्षांत इमारतीत आगीची घटना घडली नाही. बांधकाम व्यावसायिक रहिवाशांचे आयुष्य असे नशिबावर सोडू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
घर विकून पैसे वसूल करा
या इमारतीच्या 15 व 16व्या मजल्याचे बांधकाम विनापरवाना करण्यात आले आहे. हे बांधकाम नियमित करण्यासाठी बिल्डरने शुल्क व प्रीमियम भरावा. हे पैसे न भरल्यास पालिकेने येथील फ्लॅटची विक्री करून रक्कम वसूल करावी, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत.
महापालिकेचा दावा
फायर सेफ्टी सर्टिफिकेट घेण्यासाठी बिल्डरला नोटीस देण्यात आली आहे. 18 ऑक्टोबरला याची मुदत संपते. ही मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती बिल्डरने केली आहे, अशी माहिती पालिकेने न्यायालयात दिली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने हे आदेश दिले.