
मान्सूनने मुंबईतून एक्झिट घेतल्यानंतर शहर आणि उपनगरांत ‘ऑक्टोबर हीट’ची तीव्रता वाढली आहे. या उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर सध्या बेस्टच्या वातानुकूलित बसेसमधून प्रवास करण्यास पहिली पसंती देत आहेत. त्यामुळे बेस्टच्या एसी बसेस प्रवासी सेवेमध्ये ‘सुपरहिट’ ठरल्या आहेत. ऑक्टोबरच्या 20 दिवसांत तब्बल 2.28 कोटी मुंबईकरांनी एसी बसमधून प्रवास केला. त्यातून बेस्टला 25 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
सद्यस्थितीत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात 1745 एसी बसगाड्या उपलब्ध आहेत. या बसच्या साहाय्याने मुंबई शहर आणि उपनगरांत 237 मार्गांवर एसी बसेस चालवल्या जात आहेत. अनेक साध्या बसेसच्या मार्गांवर एसी बसेसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. बसेसचे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. मात्र वाढलेल्या उकाड्यामुळे मुंबईकर एसी बस प्रवासाला पहिली पसंती देत आहेत.
1 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत 2 कोटी 28 लाखांहून प्रवाशांनी बेस्टच्या एसी बसमधून प्रवास केला. बेस्टच्या साध्या बसेसचे पहिला टप्प्यातील तिकीट 10 रुपये आहे तर एसी बसेसचे किमान भाडे 12 रुपये आहे. आरामदायी आणि गारेगार प्रवास करण्यासाठी मुंबईकर बेस्टच्या एसी बसच्या जास्त तिकीट दराचा भुर्दंड सहन करीत आहेत. एसी बसेसला मिळालेला वाढता प्रतिसाद लक्षात घेत आणखी अनेक मार्गांवर साध्या बसऐवजी एसी बस चालवण्याचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली.
1 ते 20 ऑक्टोबर
एकूण प्रवासी – 2 कोटी 28 लाख
प्राप्त महसूल – 24 कोटी 50 लाख
तिकीट दरवाढीमुळे उत्पन्न वाढले
बेस्टची तिकीट दरवाढ लागू केल्यानंतर प्रवासी संख्येत सुरुवातीला मोठी घट झाली. बेस्ट उपक्रमाने थेट दुप्पट तिकीट केल्यामुळे सामान्य मुंबईकरांच्या खिशाला झळ बसली. तिकीट दरवाढीमुळे बेस्टचे उत्पन्न चांगलेच वाढले आहे. सुरुवातीला प्रवासी संख्येत घसरण झाली, मात्र एसी बसचे प्रवासी वाढल्याचे स्पष्ट होत आहे.