
सोलापूर शहर व जिल्ह्यात भाजपमध्ये बंडाळी माजली असून, भाजप पदाधिकाऱ्यांनीच शहर कार्यालयासमोर कलंकित, भ्रष्टाचारी माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाला थेट आव्हान देत आंदोलन केले. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेली ही बंडाळी म्हणजे फुटीची सुरुवात मानली जात आहे.
माजी आमदार दिलीप माने यांच्यासह चार माजी आमदारांना पालकमंत्री गोरे यांनी पक्षात घेण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. कहर म्हणजे भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना घेराव घालत प्रचंड घोषणाबाजी करत निवेदन देण्यात आले. भाजपचे पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी केलेले हे आंदोलन म्हणजे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि आताचे भाजपाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना थेट आव्हान दिल्याची चर्चा रंगली आहे.
सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार राम सातपुते यांचा पराभव झाल्यानंतर पक्षात गटबाजी उफाळून उभी फूट पडली आहे. अशातच माजी मंत्री सुभाष देशमुख व विजय देशमुख यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, तर काँग्रेसमधून भाजपात आलेले जयकुमार गोरे यांना पालकमंत्रीपद दिले. आता मुख्यमंत्री फडणवीस काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी आमदारांना व नेत्यांना भाजपात प्रवेश देत आहेत. यामुळे भाजपातील जुने पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचंड नाराज असून, याचीच प्रचिती आंदोलनाच्या माध्यमातून दिसून आली.
माजी आमदार दिलीप माने यांच्यासह चार माजी आमदारांना भाजपात प्रवेश देण्याचा घाट पालकमंत्री गोरे व मुख्यमंत्री फडणवीस यांनी घातला आहे. परंतु, भाजप पदाधिकाऱ्यांनी ऐरे-गैरे, कलंकित, भ्रष्टाचारी माजी आमदारांना पक्षप्रवेशासाठी विरोध असल्याचे जाहीर केले. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर मध्यरात्री माजी उपमहापौर व नगरसेवकांना पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला. याचा थांगपत्ता आमदार सुभाष देशमुख व विजय देशमुख यांना नव्हता. दरम्यान, माजी आमदार दिलीप माने यांनी मेळावा घेऊन भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर करताच विरोधाचा भडका उडाला आहे. शहर भाजपा कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी काळी टोपी घालून घोषणाबाजी करत मानेंच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. यात आमदार सुभाष देशमुख समर्थक पदाधिकारी, नऊ नगरसेवकांसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. संतप्त पदाधिकारी व नगरसेवकांनी भ्रष्ट कलंकित माजी आमदाराला प्रवेश देऊ नये, अशा आशयाचे निवेदन दिले. मात्र, यात माने यांचा थेट उल्लेख नव्हता. दरम्यान, आमदार सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री गोरे यांना आव्हान दिल्याचे चित्र आहे.