अखेर मुदत संपलेली आडते असोसिएशन लागली कामाला, आडत्यांना ‘स्पीड’मध्ये सर्वसाधारण सभेची नोटीस

उच्च न्यायालयाने 15 नोव्हेंबरच्या आत श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुक प्रकरण निकाली काढण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे मुदत संपूनही निवडणूक न घेणारी आडते असोसिएशनने कामाला लागली आहे. निवडणुकीचा निकाल कोर्टात न लागता आपणच निवडणुक घेत असल्याचे दाखविण्यासाठी स्पीड पोस्टाव्दारे सुमारे 25 ते 30 हजार रूपये खर्चून सभासद आडत्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसा धाडल्या आहेत. त्यामुळे कार्यकाळ संपण्यापुर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा का घेतली नाही असा प्रश्न आडत्यांना पडला आहे.

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणुक 2021 मध्ये पार पडली. आता असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीची आणि कार्यकारिणीची मुदत डिसेंबर 2024 मध्येच संपली. कार्यकारिणीचा कार्यकाळ संपण्यापुर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन निवडणुक घेण्याचा निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही आडते असोसिएशन कार्यकारिणीने निवडणूक घेण्याच्या काहीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणुक धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली घेण्याची मागणी आडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ तसेच आडतदार दिलीप खिरीड यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. त्यावर काहीच कार्यवाही होत नसल्याने भुजबळ, खिरीड यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दोन्ही वकीलांचे म्हणने ऐकूण घेत 15 नोव्हेंबर 2025 च्या आत हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत.

मुदत संपलेल्या कार्यकारीणीची लगीनघाई

मुदत संपल्यानंतर आडते असोसिएशने निवडणुक घेणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या दोन वर्षांच्या काळात आडत्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर होत गेले. कार्यकाळ संपण्यापुर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नाही. गेल्या दहा महिन्यांतदेखील बैठक घेतली नाही. असोसिएशनच्या एका संचालकाने पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे निवडणुकीला आणि आडत्यांकडे मतांसाठी सामोरे जाण्याचे धाडस आडते असोसिएशन कार्यकारीणीत नव्हते. आता न्यायलयाचे धर्मादाय आयुक्तांना आदेश येताच आडते असोसिशनची लगीनघाई सुरू झाली असून शुक्रवारी (दि.31) वार्षिक सर्वसाधारण सभा ठेवली आहे.

मुदत संपूनही निवडणूक घेतली जात नसल्याने धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागितली. तिथेही तारखांवर तारखा पडू लागल्या. त्यामुळे आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अमोल घुले यांच्या पुढाकाराने दिलीप खिरीड आणि मी नाईलाजास्तव उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायालयाच्या दणक्यामुळे निवडणुक लागण्याचा मार्ग दिसू लागला आहे.
– विलास भुजबळ, माजी अध्यक्ष, आडते असोसिएशन.