
कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात फरार झालेला कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा युरोपात वावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला देशात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटनमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. बनावट पारपत्रांच्या आधारे तो परदेशात गेल्याचे तपासात उघड झाले आहे.
घायवळविरुद्ध पूर्वीच रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी पोलिसांनी ब्ल्यू कॉर्नर नोटीसही बजावली असून इंटरपोललाही याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नीलेश घायवळसह भाऊ सचिन घायवळ याच्याविरुद्ध नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. मात्र सचिन घायवळ सध्या फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
नीलेश घायवळने ‘घायवळ’ऐवजी ‘गयावळ’ नावाने बनावट कागदपत्रे तयार करून अहिल्यानगर येथून ‘तत्काळ’ प्रक्रियेतून पारपत्र मिळवले असल्याचे तपासात समोर आले आहे. या पारपत्राच्या आधारे तो 90 दिवसांच्या व्हिसावर परदेशात गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घायवळविरुद्ध आतापर्यंत खून, खंडणी, संघटित गुन्हेगारी यांसह आठ गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्या प्रत्यार्पणानंतर या प्रकरणांच्या तपासाला गती मिळेल, अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.





























































