
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमच्या नावाचा वापर करून ठगाने वृद्धाची 72 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
मुलुंड येथे राहणाऱया वृद्धाला काही दिवसांपूर्वी एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱयाने तो नाशिकच्या एका पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवले. पोलीस ठाण्यात तुमच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असून मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमला दहा टक्के कमिशनची रक्कम बँक खात्यात पाठवल्याचे ठगाने त्यांना सांगितले. त्यानंतर ठगाने त्यांना दहा फोटो पाठवले. त्यामध्ये त्यांना स्वतःचा फोटो पाहून धक्काच बसला. त्यावर विश्वास बसल्याने ठगाने त्यांना व्हिडीओ कॉल करण्यास सुरुवात केली. त्यांना ठगाने अटकेची भीती दाखवली. सुप्रीम कोर्टाच्या लेटरहेडरवर अटकेचे आदेश तक्रारदारांना पाठवले. प्रकरण हे गंभीर असल्याने ते कोणालाही सांगू नये असे त्यांना सांगण्यात आले. जर तपासात सहकार्य केले नाही तर अटक केली जाईल अशी भीती दाखवली व ठगाने 72 लाख रुपये उकळले. तपास पूर्ण झाल्यावर ती रक्कम खात्यात जमा होईल असे सांगितले, मात्र ती रक्कम खात्यात जमा झाली नव्हती. त्यानंतर तक्रारदारांनी त्या नंबरवर फोन केला. तेव्हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. याप्रकरणी त्यांनी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.





























































