कापूस, सोयाबीन खरेदीमध्ये व्यापाऱ्यांची मनमानी

दीपावली सणात सोने-चांदीचे दर गगनाला भिडलेले आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ‘पांढऱ्या सोन्या’ला कवडीमोल दर मिळत आहे. पावसात भिजलेला कापूस 4 हजार 500 रुपये व चांगला कापूस 7 हजार रुपये दराने विकला जात आहे. तर खुल्या बाजारात व्यापारी मनमानी करत असून, अडीच ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन खरेदी केले जात आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यात व्यापाऱ्यांची काटामारी, मजुरांची वाणवा पावसाचा फटका अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

अतिवृष्टी आणि शासकीय उदासीनता अशा दुहेरी संकटात सोयाबीन उत्पादक शेतकरी सापडला असून, बाजारपेठेतील मनमानीमुळे शेतकऱ्यांना कवडीमोल दराने सोयाबीन विकण्याची वेळ आली आहे. जिल्हा पणन संघाने प्रस्ताव पाठवून महिना उलटला तरीही हमीभाव केंद्रांना शासनाकडून मान्यता मिळालेली नाही. खुल्या बाजारात अडीच ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन विकून शेतकरी आपली गरज भागवत आहे.

खरीप हंगामात राहुरी तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर सोयाबीन व कापसाचे क्षेत्र होते. मे, जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पीक जोमदार आले; पण काढणीच्या वेळी अतिवृष्टीने सोयाबीन व कापसाचे उभे पीक नष्ट झाले. नैसर्गिक आपत्तीमधून वाचलेला माल बाजारात घेऊन गेल्यावर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सोयाबीनचा हमीभाव (एमएसपी) 5,328 प्रतिक्विंटल जाहीर केलेला असतानाही, खुल्या बाजारात दर कोसळले आहेत. व्यापारी डागलेला आणि आर्द्रता (मॉईश्चर) यांचे कारण देत शेतकऱ्यांकडून कमी दरात सोयाबीन खरेदी करत असल्याने शेतकरी भरडला जात आहे.

सोयाबीन काढण्यासाठी एकरी सात ते आठ हजार रुपये मजुरी घेत आहे. मशिनमधून सोयाबीन काढण्यासाठी एका पोत्याचे 100 ते 150 घेतले जातात, तर कापूस वेचणीसाठी 15 ते 16 किलो दर मजूर घेत आहेत. खुल्या बाजारात कापूस 3 हजार 500 ते 4 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. सोयाबीन 3 हजार ते 4 हजार या दराने प्रतिक्विंटल खरेदी केली जात आहे.

हमीभाव कागदापुरताच
डाग लागलेली सोयाबीन चक्क 2500 ते 2800 प्रतिक्विंटल तर सुस्थितीतील सोयाबीन फक्त 4000 ते 4100 प्रतिक्विंटल या दराने खरेदी केले जात आहे. विशेष म्हणजेच शेतकऱ्यांच्या चांगल्या मालासाठीही हमीभावापेक्षा थेट 1,200 ते 1,500 रुपये प्रतिक्विंटलने कमी दर मिळत आहे.

पावसाची हजेरी; मजूर सुट्टीवर, वेचणी ठप्प
नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापसाच्या वेचण्या अडकल्या. दीपावलीच्या सुटीमुळे मजूर वर्ग गावाकडे गेल्याने शेतात काम करणारे हात कमी झाले. त्यामुळे उत्पन्नात जवळपास निम्म्याने घट झाली. शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

एमएसपीप्रमाणे सोयाबीन खरेदी करण्यासाठी जिह्यातून 26 हमीभाव खरेदी केंद्राचे प्रस्ताव शासनाला पाठवले आहेत. शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ हमीभाव केंद्र सुरू करण्यात येतील.
– भरत पाटील, जिल्हा पणन अधिकारी, अहिल्यानगर