
सातारा जिह्यातील प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण होऊन बराच कालावधी लोटला, तरी अद्याप बदल्या झालेल्या 1892 शिक्षकांना कार्यमुक्तीचा आदेश न मिळाल्याने त्यांच्यात अस्वस्थता आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्यामुळे कार्यमुक्ती आचारसंहितेच्या चक्रात अडकण्याची भीती संबंधित शिक्षकांना सतावत आहे.
सातारा जिह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया शासकीय आदेशानुसार मे-2025 पासून पाच टप्प्यांत राबविण्यात आली होती. राज्यस्तरावरून ऑनलाईन पोर्टलद्वारे ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. 2083 शिक्षकांचा बदली प्रक्रियेत सहभाग होता. त्यातील 6 शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली असून, दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीत 185 शिक्षक अयोग्य आढळून आल्याने एकूण 191 शिक्षकांची बदली प्रक्रिया थांबवण्यात आली.
या संपूर्ण प्रक्रियेतून 1 हजार 892 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे बदल्या झाल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु कार्यमुक्तीचे आदेशच न मिळाल्यामुळे त्यांच्या बदल्या अधांतरी राहिल्या आणि त्यांच्या आनंदावर विरजण पडले. हे सर्व शिक्षक कार्यमुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत दिवस ढकलत आहेत. त्यांच्यातील ही अस्वस्थता लपून राहिलेली नाही. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यामुळे कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल, अशी चर्चा सुरू आहे. आता आचारसंहिता आज लागते की उद्या अशी घालमेल राजकीय कार्यकर्त्यांसह शिक्षक वर्गातही सुरू झाली आहे. परिणामी कार्यमुक्ती आचारसंहितेच्या चक्रात अडकण्याची भीती बदली झालेल्या शिक्षकांना सतावत आहे.
बदली शिक्षक 3 रोजी नवीन शाळेवर!
बदल्या झालेल्या प्राथमिक शिक्षकांमधील ज्यांच्या बदल्यांच्या बाबतीत कसल्याही तक्रारी, आक्षेप, अडचणी नाहीत, अशा सर्व शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश तयार होत आहेत. दिवाळी सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 3 नोव्हेंबरला सकाळी संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येईल. दुपारपर्यंत बदली झालेल्या शाळेवर त्यांना हजर व्हायला सांगणार.
– अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक),सातारा जिल्हा परिषद.





























































