
बच्चे कंपनीपासून ते आजी-आजोबांपर्यंत सर्वांची लाडकी असलेली माथेरानची राणी आज पाच महिन्यांनंतर झोकात धावली. तब्बल सहा तासांहून अधिक वेळ या टॉयट्रेनची चाचणी घेण्यात आली. सुट्टीवर गेलेली माथेरानची राणी सर्व अडथळे पार केल्यानंतर आता 1 नोव्हेंबरपासून पुन्हा सेवेत रुजू होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना नेरळ ते माथेरान यादरम्यान निसर्गाचा मनमुराद आनंद घेत टॉयट्रेनमधून प्रवास करता येणार आहे.
पावसामुळे माथेरानची राणी बंद होती. तब्बल १५६ दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज धावली तेव्हा कर्मचाऱ्यांसह उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी नेरळ स्थानकात या टॉयट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर चालक एस. आर. सिंग यांनी मोठ्या उत्साहात राणीचे सारथ्य केले. गाडीला तीन डबे जोडण्यात आले होते. हार व फुलांनी माथेरानची राणी सजवण्यात आली. त्यानंतर ट्रेनचा प्रवास सुरू झाला.
चार स्थानके नेरळ ते माथेरानदरम्यान जुम्मापट्टी, वॉटर पाइप, अमन लॉज व माथेरान अशी चार स्थानके आहेत. अत्यंत धीम्या गतीने टॉयट्रेनची चाचणी सुरू होती. रेल्वे ट्रॅकमध्ये नेमके अजून कोणते अडथळे आहेत याची पाहणी कर्मचारी, अभियंते करीत होते. संध्या सहा वाजेपर्यंत गाडीने वॉटर पाइप स्थानक गाठले. उशिरापर्यंत ही चाचणी सुरू होती. त्याचा अहवाल रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. सर्व परीक्षांमध्ये माथेरानची राणी उत्तीर्ण झाल्यानंतर १ नोव्हेंबरपासून नियमितपणे ही ट्रेन धावणार आहे.






























































