
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ऑनलाइन कारभार ठप्प झाला आहे. यामुळे केडीएमसी मुख्यालयासह दहा प्रभागांमधील नागरी सुविधा केंद्रांमध्ये मागील चार दिवसांपासून पाणी देयक, मालमत्ता कर आणि इतर ऑनलाइन कामे रखडली आहेत. तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून दररोज शेकडो नागरिक पालिकेचे उंबरठे झिजवत आहेत.
तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांच्या पाणी देयक आणि मालमत्ता कर भरण्याच्या मुदती संपल्या आहेत.
ऑनलाइन प्रणाली ठप्प असल्याने आता उशिराने देयक भरल्यास दंडात्मक रक्कम भरावी लागणार आहे. तांत्रिक कारणामुळे आम्ही वेळेत देयक भरू शकलो नाही तरी दंड आम्हालाच का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. महापालिकेच्या दहा प्रभागांतील नागरी सुविधा केंद्रांमधून दररोज लाखो रुपयांचे देयक वसूल केले जाते. मात्र संकेतस्थळ बंद असल्याने केवळ नागरिकच नव्हे तर केंद्रातील कर्मचारी आणि अधिकारीही हतबल झाले आहेत.
ठेकेदार कंपनी जबाबदार
ऑनलाइन सुविधा पुरवणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या संकेतस्थळात मागील चार दिवसांपासून तांत्रिक अडथळे निर्माण झाले आहेत. सर्व्हर डाऊनचा याच्याशी संबंध नाही. संबंधित ठेकेदार कंपनीला याबाबत कळवण्यात आले असल्याचे पालिकेच्या एका तांत्रिक अधिकाऱ्याने सांगितले. मात्र ठेकेदार कंपनीकडून विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.






























































