
>> प्रभाकर पवार, [email protected]
शाळेतील मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी म्हणून ‘स्वच्छता मॉनिटर’ अभियान गुजरातमध्ये राबवून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुकास पात्र ठरलेला पुण्याचा रहिवासी रोहित आर्या (४९) यास गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई पोलिसांनी पवई येथे गोळी घालून ठार मारले. पवई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी आपल्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून रोहित आर्याच्या छातीचा वेध घेतला. रोहित आर्याने महाराष्ट्र सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी १७ मुलांना पवई येथील आर. ए. स्टुडिओमध्ये ओलीस ठेवले होते. अपहरणकर्ता ऐकत नाही, मुलांची सुटका करीत नाही, असे लक्षात आल्यावर अमोल वाघमारे यांनी त्यास गोळी घालून ठार मारले, परंतु नितीन सातपुते या वकिलांनी चकमक खोटी असल्याचा दावा करून न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
रोहित आर्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रशंसा केल्यानंतर मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविणाऱ्या रोहित आर्याला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी जवळ केले होते. तेव्हा “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान रोहित आर्याने महाराष्ट्रात राबविले. त्यासाठी शिक्षण विभागाने दोन कोटी रुपयांची तरतूदही केली होती, परंतु रोहित आर्याला काही पैसे दिले गेले नाहीत. रोहितने मंत्र्यांच्या घरासमोर उपोषणही केले. त्याकडेही शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे संतापलेल्या, त्रस्त झालेल्या रोहित आर्याने ज्या मुलांना स्वच्छतेचे धडे दिले होते, अशा लहान मुलांचे अपहरण करून, त्यांना ओलीस ठेवून शासनाकडे थकलेल्या पैशांची मागणी करायची असा प्लॅन केला. त्याप्रमाणे रोहित आर्याने डॉक्युमेंटरी ऑडिशनच्या नावाखाली लहान मुलांना वर्तमानपत्रात जाहिरात देऊन पवई येथे बोलाविले व त्यांना ओलीस ठेवून सरकारकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. परंतु त्याचा तो प्रयत्न फसला. त्याला स्वतःलाच आपला जीव गमवावा लागला. पैशांऐवजी त्याला शासनाकडून गोळी खावी लागली. ज्या मंत्र्याशी एका पोलीस अधिकाऱ्याने संपर्क साधला तेव्हा तो माजी मंत्री आर्याशी बोलला असता तर आर्याचे प्राण नक्कीच वाचले असते. त्यामुळे आर्याचा बळी हा त्या मंत्र्याने घेतला की काय? असा सवाल करण्यात येत आहे.
सांगलीच्या हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने सरकारने आपले दीड कोटी रुपये थकविले म्हणून अलीकडे आत्महत्या केली. पी. व्ही. वर्मा या नागपूरच्या कंत्राटदारानेही तेच केले. सरकारने ३० कोटी रुपये थकविले म्हणून गळफास लावून घेतला. रोहित आर्याही आत्महत्या करणार होता, परंतु त्याने अचानक प्लॅन बदलला आणि पोलिसांच्या गोळीला तो बळी पडला. महाराष्ट्रात रोज शेतकरी व कंत्राटदार आत्महत्या करीत आहेत, परंतु शासन एकदम ढिम्म, निगरगट्ट झाले आहे. पोलिसांच्या चकमकींवर शंका घेण्यात
येऊ लागल्यामुळे मुंबई पोलिसांनी गेली १५ वर्षे चकमकी बंद केल्या होत्या. ३१ ऑक्टोबर २०१० रोजी मुंबई क्राईम ब्रँचच्या अरुण चव्हाण, नंदकुमार गोपाळे, संजय निकम या अधिकाऱ्यांनी अंकुश नारकर ऊर्फ मंग्या या लुटारूला चकमकीत ठार मारले होते. त्यानंतर पोलिसांच्या चकमकी थंडावल्या. रोहित आयनि लहान मुलांना वेठीस धरून आपले दोन कोटी रुपये सरकारकडून वसूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फसला. डोंबिवलीचा गुंड आनंद डेंगळे हा चेंबूर येथील ‘त्रिवेणी’ या इमारतीमधील एका व्यापाऱ्याच्या फ्लॅटमध्ये घुसला व त्याने तेथे काम करणाऱ्या मोलकरणीलाच एका खोलीत डांबून मालकाकडे २५ लाख रुपयांची मागणी केली, परंतु तत्कालीन पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांच्या पथकातील चेंबूर पोलीस ठाण्याचे वपोनि भीमदेव राठोड. संजय मोरे, संजय भापकर या अधिकाऱ्यांनी ‘त्रिवेणी इमारतीबाहेर जमलेल्या शेकडो लोकांसमोर आनंद डेंगळेला गोळ्या घालून ठार मारले. बिहारमधून मुंबईत आलेल्या राहुल राज सिंग या तरुणाने कुर्ला येथून बस प्रवाशांचे अपहरण केले. रिव्हॉल्व्हरच्या धाकावर बस प्रवाशांना ओलीस ठेवले. काहींना गोळी झाडून जखमी केले. तेव्हा कुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहम्मद जावेद यांना आपल्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हरचा वापर करावा लागला. रिव्हॉल्व्हरधारी राहुल राज सिंग यास मोहम्मद जावेद यांनी बसमध्येच गोळी घातली आणि प्रवाशांची सुटका केली, अमोल वाघमारे यांनी तेच केले. लहान मुलांचे बरेवाईट होण्यापूर्वीच वाघमारे व संबंधित पोलीस घटनास्थळी पोचले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. परंतु रोहित आर्यासारखे असे असंख्य कंत्राटदार आहेत, ज्यांना सरकार त्यांनी केलेल्या कामाचे पैसे देत नाही. बिल पास करीत नाही म्हणून त्रस्त आहेत. उद्या त्यांच्याकडूनही रोहित आर्यासारखा भयंकर प्रकार घडू शकतो. तेव्हा राज्यकर्त्यांनी रोहित आर्या अपहरण प्रकरण हलक्यात घेऊ नये.
रोहित आयनि मुलांना डॉक्युमेंटरी ऑडिशनच्या नावाखाली वर्तमानपत्रात जाहिरात देऊन त्यांची दिशाभूल केली. तीन-साडेतीन दशकांपूर्वी मोहन सिंग नावाच्या भामट्याने वर्तमानपत्रात नोकरीची जाहिरात देऊन मुलाखतीसाठी तरुणांना एका तारांकित हॉटेलात बोलाविले होते. शिक्षित, पदवीधर तरुण मुले तेव्हा खूश झाली होती. मुलाखत संपल्यावर मोहन सिंग हा दक्षिण मुंबईतील ऑपेरा हाऊस येथील त्रिभुवनदास भिमजी ज्वेलर्सच्या दुकानात या २५ ते ३० तरुणांना सोबत घेऊन गेला. आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्याने दुकानात ‘रेड’ केली व दुकानातील ३५ ते ४० लाखांचे दागिने ताब्यात घेऊन तो निघून गेला. वर्तमानपत्रात जाहिरात वाचून मुलाखतीसाठी मोहन सिंगकडे गेलेले तरुण मात्र फसले. त्यांना पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागले. मोहन सिंग अद्यापि पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सांगायचे तात्पर्य हे की. अलीकडे वर्तमानपत्र किंवा चॅनल, व्हॉटस् अॅप, फेसबुक आदी प्रसारमाध्यमांतून आकर्षक जाहिराती दिल्या जातात, परंतु खऱ्याखोट्या जाहिरातींची कुणीही खातरजमा करीत नाही. फसले गेल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली जाते. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.




























































