
कोथरूडमध्ये तीन मुलींना फ्लॅटमधून ताब्यात घेऊन पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती, तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सहायक पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
कोथरूड पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, कर्मचारी श्रुती कडणे, छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे, पोलीस हवालदार विनोद परदेशी, सायबर पोलीस विभागाचे धनंजय सानप, छत्रपती संभाजीनगरचे माजी पोलीस अधिकारी सखाराम सानप यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे निर्देश कोर्टाने दिले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्तांमार्फत करावा असे आदेशही कोर्टाने दिले.
नेमकं काय घडलं होतं?
छत्रपती संभाजीनगर जिह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेण्यात आलं. तसेच त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण केल्याचा आरोप मुलींनी केला होता. या पीडित मुलींनी कारवाईची मागणी करत पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले होते. या प्रकरणाने मोठी खळबळ माजली होती.




























































