मिंधे गटात खदखद आणि कमळाबाईशी गडबड-बडबड, मिंधेंची अमित शहा यांच्या भेटीनंतर नेत्यांची भाषा बदलली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूकसंमतीने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून मिंध्यांच्या मंत्र्यांनी शिंदे गटातील अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली. पण दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीनंतर नेत्यांची भाषा काहीशी बदलली असली तरी मिंधे गटात खदखद आणि कमळाबाईशी गडबड-बडबड सुरूच आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कुरघोडय़ांमुळे महायुतीच्या घटक पक्षांतील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या राज्यातील दोन्ही प्रमुख नेत्यांनी ठरवल्यानंतरही बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपकडून मित्रपक्षांच्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास भाग पाडण्याचे उद्योग सुरूच आहेत. महायुती सरकारमध्ये एकीकडे कमळाबाईच्या मंत्र्यांकडून आर्थिक कोंडी होत असताना स्थानिक पातळीवरही राजकीय कोंडी होताना दिसत आहे. कोल्हापुरातील शिरोळ आणि जयसिंगपूर नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेस हे कट्टर राजकीय वैरी एकत्र आल्याने शिंदे गटातील खदखदही स्थानिक पातळीवर उफाळून येण्यास सुरुवात झाली आहे.

अमरावतीत फडणवीसांचे मामेभाऊ बिनविरोध

अमरावती जिह्यातील चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे नगरसेवकपदाचे उमेदवार होते. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आल्हाद कलोती यांच्या प्रभागातून रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारासह नऊ उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने बिनविरोध निवडून येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिरोळ्यात महायुतीतील खदखद चव्हाट्यावर

शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिंदे गटाचे असूनही स्थानिक भाजप पदाधिकाऱयांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर आणि आमदार यड्रावकर यांच्यातील स्थानिक राजकीय संघर्षामुळे भाजपने यड्रावकरांना एकटे पाडण्यासाठी थेट काँग्रेसला साथ देणे पसंत केले आहे. यामुळे महायुतीतीत अंतर्गत खदखद चव्हाटय़ावर आली आहे.

जामनेरमध्ये भाजपचा मित्रपक्षालाही ‘दे धक्का’

जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आणत विरोधकांबरोबर मित्रपक्षालाही धक्का दिला आहे. जामनेर नगरपालिकेत महाविकास आघाडीकडून ज्योत्स्ना विसपुते यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटालाही धक्का दिला आहे. प्रभाग क्र. 1 आणि 13 ‘ब’ मध्ये शिंदे गटाचे आणि भाजपचे उमेदवार आमने सामने होते.

गडबड – उदय सामंत यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांचे कौतुक

एकनाथ शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांची अमित शहांकडे तक्रार केली. दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाण हे आमच्या सर्वांपेक्षा पदानं आणि मनानं मोठे आहेत. कोकणातील एक सहकारी जगातील मोठय़ा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी बसला याचा अभिमान आहे, असे कौतुक केले.

बडबड – बापू म्हणतात… सांगोल्यात मला एकटे पाडले, ते फडणवीसांना दिसत नाही काय?

लोकसभा निवडणूक सोडून उपचार घेतले असते तर माझा आजार असा बिकट कॅन्सरपर्यंत गेला नसता. मृत्यूच्या दारात असताना भाजप उमेदवाराला 15 हजारांचे मताधिक्य दिले. याचे फळ म्हणून मला सांगोल्यात एकटे पाडले का? ते फडणवीसांना दिसत नाही का? असा सवाल शहाजी बापू यांनी केला.

खदखद – शहा यांनी दणकावल्यानंतर शिंदे गटातील आमदारांमध्ये खदखद वाढली

अमित शहांनी दणकावल्यानंतर मिंध्यांच्या आमदारांत खदखद वाढण्यास सुरुवात झाली आहे. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी भाजपचे उमेदवार भास्कर बांगर यांना उमेदवारी मागे घ्यायला लावत शिवसेनेत प्रवेश दिला.