
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीनवर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याने संतापाची लाट उसळली आहे. संशयिताला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारोंच्या जमावाने शुक्रवारी थेट न्यायालयावरच धडक दिली. आवाराचे गेट तोडून थेट न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱया जमावावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. मालेगावात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे रविवारी, 16 नोव्हेंबर रोजी तीनवर्षीय बालिकेचे अपहरण करण्यात आले. अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. याप्रकरणी संशयित विजय खैरनार याला मालेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याला त्वरित फाशी द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करीत काल गुरुवारी हजारो नागरिक न्यायालयासमोर जमल्याने पोलिसांनी या संशयिताला न्यायालयात आणलेच नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर केले.
आज शुक्रवारी मालेगाव बंद पुकारण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. नराधमाला फाशी द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या, अशा घोषणा देत तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. याचवेळी संशयिताला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याच्या अफवेने मोर्चा थेट न्यायालयाकडे वळला. न्यायालयाचे गेट तोडून संतप्त जमावाने न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांना लाठीहल्ला करून या जमावाला पांगवावे लागले. दरम्यान, जनआक्रोशाची जाणीव झाल्याने राज्य सरकारने हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मालेगाव शहरासह तालुक्यात संतापाची लाट उसळलेली असून, तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस बंदोबस्तात मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.































































