
देशात चार नवे कामगार कायदे आजपासून लागू झाले आहेत. केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे. नव्या कायद्यांमुळे कामगारांना किमान वेतनाची हमी देण्यात आली असून 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेचे सुरक्षा कवच मिळणार आहे. नवे कायदे लागू झाल्यामुळे जुने आणि कालबाह्य झालेले 29 कायदे रद्द करण्यात आले आहेत.
यासंदर्भात केंद्रीय कामगार मंत्री मानसुख मांडविया यांनी माहिती दिली. चारही कामगार संहिता अधिसूचित करण्यात आल्या असून त्यांचे रूपांतर आता कायद्यात झाले आहे. हे कायदे तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. त्यात नवीन वेतन संहिता (2019), औद्योगिक संबंध संहिता (2020), सामाजिक सुरक्षा संहिता (2020) आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिति संहिता (2020) यांचा समावेश आहे. लिंगभेद रहित धोरणे, 2 सदस्यीय लवादांमार्फत जलद तंटा निवारण अशा तरतुदी नव्या कायद्यांत आहेत.
कामाचे तास वाढले
नव्या कामगार कायद्यांमधील महत्वाचा बदल म्हणजे कामाचे तास वाढले आहेत. 8 ते 12 तास दररोज आणि आठवडय़ात 48 तास काम करावे लागणार आहे. मात्र, हा नियम विडी कामगार तसेच खाण कामगारांना लागू असेल. या कामगारांनी वर्षातून 30 दिवस जरी काम केले तरी त्यांना बोनस द्यावा लागेल.
काही क्षेत्रातील परिभाषा प्रथमच स्पष्ट
फिक्स टर्म किंवा कंत्राटी कामगारांनादेखील कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे रजा, वैद्यकीय आणि सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळणार आहे. तसेच गिग वर्क, प्लॅटफॉर्म वर्क आणि अग्रिगेटर वर्क यांची नव्या संहितेतून प्रथमच परिभाषा स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कामगारांना लाभ होणार आहे. तसेच डिजिटल क्षेत्रातील पत्रकरांसह इतर कामगार देखील संपूर्ण लाभ मिळण्यासाठी पात्र असतील.
नवीन कामगार कायद्यात काय म्हटले आहे?
सर्व कामगारांना किमान वेतन आणि तेही वेळेवर मिळेल याची हमी, तरुणांना नियुक्ती पत्र मिळण्याची हमी, महिलांना समान वेतन आणि सन्मान, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांना वार्षिक मोहात तपासणीची हमी, ओव्हरटाइम केल्यास दुप्पट वेतन, देशभरातील धोकादायक क्षेत्रातील कामगारांसाठी इएसआयसी च्या माध्यमातून 100 टक्के आरोग्य सुरक्षा मिळणार आहे याचा लाभ 40 कोटींपेक्षा जास्त कामगारांना होणार आहे.
7 तारखेच्या आत पगार
आयटी व आयटी एनेबल्ड सर्व्हिसेस या क्षेत्रातील कंपन्यांना कर्मचाऱयांचा पगार 7 तारखेच्या आत देणे बंधनकारक असेल. ‘फिक्स टर्म’वर काम करणाऱ्या कर्मचाऱयाला आता एका वर्षाची सेवा झाल्यावरही ग्रॅच्युईटी मिळेल.




























































