अजुनी रुसुनी आहे, कमळीनं केलीय मिंध्यांची लय बेक्कार कोंडी, पाटण्याहून भाऊ आणि दादा एकाच विमानातून परतले… तर शिंद्यांचे वेगळे उड्डाण

फोडाफोडीच्या राजकारणावरून शिंदे गट आणि भाजपात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. कमळीने मिध्यांची लय बेक्कार कोंडी केली असून मिंधे अजूनही रुसून आहेत. गुरुवारी पाटण्यातून मुख्यमंत्री देवाभाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा एकत्र विमानाने परतले तर शिंध्यांनी मात्र वेगळे उड्डाण घेतले. आज हुतात्मा स्मारक येथे शिंदे पोहचले तिथेही त्यांचे गाल फुगलेले होते. फडणवीस आणि शिंदे आमनेसामने आले; पण फडणवीसांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत भाजप आणि शिंदे गटात फोडाफोडीचे राजकारण रंगले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पक्षात होलसेल भरती करत शिंदे गटाला धक्क्यावर धक्के देत सुटले आहेत. त्यामुळे शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली असून शिंदेंच्या मंत्र्यांनी आधी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला, नंतर शिंदे थेट दिल्लीतले आका अमित शहांकडे गेले. तिथे गाऱहाणे मांडूनही काहीच हाती न पडल्याने शिंदेंचा कोंडमारा झाला आहे.

शिंदे दिल्लीतून बिहारला पोहचले. तिथे गुरुवारी नितीश कुमार सरकारच्या शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहिले. तिथून मुंबईला येताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संग टाळळा. देवाभाऊ आणि दादा एकत्र मुंबईला परतले तर शिंदे वेगळ्या विमानाने आले. हा रुसवा-फुगवा आणि दुरावा आजही दिसला.

हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारक येथे पोहचले. तिथे प्रथम मुख्यमंत्र्यांनी आणि नंतर शिंदेंनी स्मारकावर पुष्पचक्र वाहिले. या वेळी शिंद्यांचे गाल फुगलेले होते. दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. समोर येऊनही फडणवीस यांनी शिंध्यांकडे ढुंकूनही पाहिलं नाही. हे व्हिडिओ माध्यमांवर झळकले असून महायुतीत काहीच आलबेल नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.