
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या वर्षाच्या अखेरीस नियोजित असलेला त्यांचा हिंदुस्थान दौरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट तिसऱ्यांदा पुढे ढकलली आहे. नवी दिल्लीत दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. हा हल्ला गेल्या दशकातील सर्वात मोठा होता, ज्यात किमान १५ नागरिकांनी आपला जीव गमवला.
इस्रायली मीडिया अहवालानुसार (i24NEWS), नेतन्याहू यांनी याआधी २०१८ मध्ये हिंदुस्थान दौरा केला होता. मात्र सध्याच्या सुरक्षा यंत्रणेचे मूल्यांकनानंतर हा दौरा आता रद्द करण्यात आला आहे. तसेच पुढील वर्षासाठी नवीन तारखा शोधत असल्याचे कळते. या वर्षात त्यांचा दौरा रद्द करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी, इस्रायलमधील १७ सप्टेंबरच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे तसेच निवडणुकांमुळे वेळापत्रकातील अडचणींचे कारण देत त्यांनी ९ सप्टेंबर रोजीचा दौरा रद्द केला होता. एप्रिलमधील निवडणुकांपूर्वीही त्यांनी असाच निर्णय घेतला होता.
नेतन्याहू यांचा हा दौरा त्यांच्या जागतिक स्तरावरील स्थानाचे आणि स्वीकाराचे प्रदर्शन करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात होता. त्यांच्या पक्षाने जुलैमध्ये पंतप्रधान मोदी, ट्रम्प आणि पुतिन यांच्यासोबतचे त्यांचे फोटो असलेले बॅनर लावून त्यांना ‘अद्वितीय उंचीचा नेता’ म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
नेतन्याहू यांनी जानेवारी २०१८ मध्ये हिंदुस्थानला भेट दिली होती. त्याआधी, २०१७ मध्ये पीएम मोदींनी तेल अवीवचा दौरा केला होता.























































