
गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यात बिबटय़ाने धुमाकूळ घातला आहे. दररोज विविध गावांमध्ये पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडत आहेत. बिबटय़ांच्या बंदोबस्तासाठी आता वन विभाग सतर्क झाला असून, विविध गावांमध्ये पिंजरे बसविण्यात आले आहेत. तसेच आकाशातून ड्रोनद्वारे बिबटय़ांच्या हालचालींवर वन विभागाकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
खारेकर्जुने परिसरात बिबटय़ाकडून झालेल्या हल्ल्यात पाच वर्षांच्या चिमुकलीचा बळी गेला होता, तर निंबळक परिसरात हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमधून मोठा रोष पाहावयास मिळाला. गाव बंद तसेच रास्ता रोको आंदोलन करून घटनेचा निषेध करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यात विविध गावांमध्ये वावर असणाऱया बिबटय़ांबाबत वन विभागाकडून शोधमोहीम राबविली जात आहे. तसेच गावोगावी, शाळा, वाडय़ा-वस्त्यांवर ध्वनिक्षेपणाद्वारे बिबटय़ांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. गेल्या महिन्यापासून बिबटय़ांचा वावर मानवी वस्तीत मोठय़ा प्रमाणात आढळून येत असून, शेतकऱयांच्या पशुधनाच्या शिकारी होत आहेत.
तालुक्यातील नगर, जेऊर, गुंडेगाव तीनही मंडलांमधील विविध गावांमध्ये पिंजरे बसविण्यात आले आहेत. बहुतांशी गावांमध्ये बिबटय़ांचा वावर आढळून येत आहे. यामुळे विविध गावांमधून पिंजरे बसविण्याची मागणी वाढली आहे. परंतु वन विभागाकडे पुरेसे पिंजरे उपलब्ध नसल्याची माहिती मिळत आहे.
जेऊर, वाळकी, इमामपूर, खोसपुरी, ससेवाडी, धनगरवाडी, उदरमल, मजले चिंचोली, डोंगरगण, पिंपळगाव माळवी, चास, भोरवाडी, सारोळा कासार, निंबळक, हिंगणगाव, खारेकर्जुने, देहरे, मांजरसुंबा गड, गुंडेगाव तसेच इतर गावांतील परिसरामध्ये बिबटय़ांनी वारंवार दर्शन दिलेले आहे. जेऊर, खोसपुरी, वाळकी, पिंपळगाव माळवी, निंबळक अशा विविध गावांकडून पिंजरे बसविण्यात आले आहेत. वन विभागाकडून आणखी पिंजऱयांची सोय करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
वन विभागातर्फे तालुक्यातील बिबटय़ांच्या शोधासाठी ड्रोनचा वापर सुरू करण्यात आला आहे. ज्या गावात अथवा परिसरात बिबटय़ाचे दर्शन किंवा पशुधनाची शिकार झाली, अशा ठिकाणी ड्रोनद्वारे शोध घेतला जात आहे. त्यानुसार पिंजरा बसविण्याचे नियोजन वन विभागाकडून केले जात आहे. वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, वनपरिमंडल अधिकारी विठ्ठल गोल्हार, वनरक्षक मनेष जाधव यांच्यासह प्रत्येक मंडलातील वनपाल, वनरक्षक व वनकर्मचारी बिबटय़ांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
बिबटय़ांचा वावर मानवी वस्तीकडे
n तालुक्यात सुमारे साडेसहा हजार हेक्टर वनक्षेत्र, तर बाराशे हेक्टर आर्मीचे क्षेत्र आहे. त्याचबरोबर मोठय़ा प्रमाणात खासगी डोंगररांगा आहेत. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या तसेच रानडुकरे यामुळे बिबटय़ांचा वावर मानव वस्तीकडे वाढत चालला असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

























































