
कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राम उभारण्यासाठी महापालिका जुन्या हेरिटेज वृक्षांसह 1700 झाडे तोडणार आहे. तपोवनातील वृक्षतोडीविरोधात महापालिकेकडे तब्बल नऊशे हरकती नोंदवण्यात आल्या असून या वृक्षतोडीला नाशिककरांनी कडाडून विरोध केला आहे. दरम्यान नाशिकच्या तपोवनमधली झाडं कॉन्ट्रॅक्टरसाठी कापली जाताहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जातंय, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
यावर बोलताना शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारला फटकारले आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारच्या या वृक्षतोडीच्या निर्णयावरून त्यांच्यावर ताशेरे ओढले. ” प्रभू रामांनी ज्या वनात ध्यान केले ते नाशिकमधील तपोवन वन ताब्यात घेण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. भाजप सागंते की कुंभमेळ्यासाठी या ठिकाणी साधूग्राम बांधले जाणार आहे. या दरम्यान भाजप सरकारने नाशिकमध्ये MICE (Meetings, Incentives, Conferences and Exhibitions) सेंटरसाठी निविदा भरली आहे. साधूग्रामच्या नावाखाली एक सुंदर वन ताब्यात घ्यायचे आणि नंतर ते त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला एक्झिबिशन सेंटर, हॉटेल बनवायला द्यायचे. हा असा पक्ष आहे जो निवडणुकीपुरतं हिंदुत्वाचे पालन करतो! फोडा आणि जिंका आणि आपल्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला मालामाल करा… हा तर निर्लज्जपणा आहे” असे आदित्य ठाकरे म्हणाले.































































