
नवी मुंबईच्या सानपाडा येथील वाहतूककाsंडी लवकरच फुटणार आहे. पामबीचलगत असलेल्या मोराज सर्कल येथील भुयारी मार्गाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली असून पालिकेमार्फत लवकरच हे काम हाती घेण्यात येणार आहे.
पामबीचच्या मोराज सर्कल येथील वाहतूककोंडी फोडण्यासाठी केसर सोलिटेअर इमारत येथे नवी मुंबई महापालिकेमार्फत भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने बांधकामासाठी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक असून नवी मुंबई महापालिकेने परवानगी मिळावी म्हणून हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. प्रकल्पासाठी कोणतेही कांदळवन तोडण्यात येणार नाहीत तसेच सीआरझेड कायद्याचे उल्लंघन होणार नसल्याचे न्यायालयाने नमूद करत प्रकल्पाला परवानगी दिली व सदर याचिका निकाली काढली.


























































