
फ्लिपकार्टवरून मागवलेला दोन हजारांचा एअरफ्रायर तब्बल ७० हजाराला पडल्याची घटना उघडकीस आली आहे. भामट्याने फ्लिपकार्टच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून ग्राहकाला लुटले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राहक योगेश मोहन यांनी फ्लिपकार्ट वेबसाईटवरून ऑनलाइन एअरफ्रायर खरेदी केला. त्यांनी २ हजार १०० रुपये ऑनलाइन पेमेंटही केले. मात्र त्यांची ऑर्डर अचानक रद्द झाली. यावर संतापलेल्या योगेश यांनी एक्स पोस्टवर फ्लिपकार्ट कंपनीला टॅग करत तक्रार केली. याच संधीचा फायदा घेत भामट्याने त्यांना व्हिडीओ कॉल करत संपर्क केला. त्याने फ्लिपकार्ट कंपनीचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगितले. त्याने स्क्रीन शेअरच्या मदतीने योगेश मोहन यांना रिफंड जमा झाला की नाही हे पाहण्याच्या बहाण्याने अकाऊंट नंबर व डेबिट कार्डच्या डिटेल्स मिळवल्या व त्यांच्या खात्यातील ७० हजार १८४ रुपये काढून फसवणूक केली.
सराफाला लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक
भाईंदर – सराफाला लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. तारकेश्वर पांडे उर्फ रोहित पांडे असे या भामट्याने नाव आहे. हा भामटा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पोलिसांनी त्याच्याकडून सात गुन्ह्यांची उकल केली आहे. अशोक जैन असे सोनाराचे नाव असून त्यांचे भाईंदर पश्चिमेत ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यांनी त्यांचा फ्लॅट विक्रीसाठी नो ब्रोकर वेबसाईटवर टाकला होता. ही जाहिरात पाहून भामट्याने त्यांना संपर्क केला. फ्लॅट खरेदी करायचे आहे असे भासवून पांडे याने त्यांना ६६ लाखांचा अॅडव्हान्स चेक दिला. त्यानंतर साडेसत्तावीस लाखांचे दागिने खरेदी करून अॅडव्हान्स चेकमधून पैसे घेण्यास सांगितले. दागिने घेऊन पोबारा केल्यानंतर या भामट्याने चेक पेमेंट थांबवले होते. याप्रकरणी तक्रार मिळताच पथकाने शिताफीने तपास करत त्याच्या फाऊंटन हॉटेल येथून मुसक्या आवळल्या.
पिस्तुल्याला बेड्या
भिवंडी – विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. बाळा केदारे (२२) असे तरुणीचे नाव असून आहे. गुन्हे शाखेचे पथक शांतीनगर परिसरात गस्त घालत रस्त्यावर त्यांना एक तरुण संशयास्पद फिरताना दिसला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून पथकाला एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस सापडले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक केली. त्याने हे पिस्तूल कुठून आणले व कशासाठी आणले होते याचा तपास पोलीस करत आहेत.































































