
गडचांदूर शहरात भाजप उमेदवार सुरज पांडे याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण निमजे यांच्या भावाला विट फेकून मारल्याची धक्कादायक घटना मतदानानंतर घडली आहे. या हल्ल्यात प्रकाश निमजे गंभीर जखमी झालेयत. या घटनेमुळे गडचांदूर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली.
भाजपचे प्रभाग नऊचे उमेदवार सुरज पांडे याने हा हल्ला केला. यात निमजे यांच्या डाव्या बाजूच्या कानाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सुरज पांडे याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, भाजपने त्याला उमेदवारी दिल्याने भाजपविरोधात नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
गुन्हेगाराला लोकांच्या स्वाधीन करा म्हणून पोलिस स्टेशनमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे शहरामधील वातावरण दूषित झाले असून त्याला त्वरित तडीपार करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्ते करीत आहे. निषेध करण्यासाठी आंदोलनकर्त्यां नी शहरामधून रॅली काढून बाजार बंदची हाक दिली आहे. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे.

































































