
बेस्ट बस सी-10ची मार्गिका बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक बेस्ट बस डेपोपर्यंत पूर्ववत करण्यात यावी, ही शिवसेनेची मागणी अखेर बेस्ट प्रशासनाने मान्य केली आहे. ही बस पूर्वीच्या मार्गावरून धावणार असल्याने शेकडो विद्यार्थ्यांसह रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक बेस्ट बस डेपोपर्यंतच्या क्षेत्रात रफी अहमद किडवाई मार्गावर वडाळा स्टेशनपासून माटुंगा व शीवपर्यंत अनेक शाळा व कॉलेज आहेत. याशिवाय याच मार्गात शीव रुग्णालय आहे, ज्याचा उपयोग संपूर्ण रफी अहमद किडवाई मार्ग परिसरातील नागरिकांना होतो, शिवडी, ज्ञानेश्वर नगर, किडवाई नगर, सहकार नगर, आझाद नगर येथील रहिवाशांना सी- 10 बस शिवाय दुसरी सार्वजनिक उपक्रमाची वाहतूक व्यवस्थाच नाही. बेस्ट प्रशासनाने ऑक्टोबरपासून सी- 10 ही बस मार्गिका बदलून बॅकबे आगार ते आणिक आगार, प्रतीक्षा नगर, शीव-कोळीवाडा येथे केल्यामुळे ही बस रफी अहमद किडवाई मार्गावर येत नव्हती. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, दिव्यांग, महिला प्रवाशांची गैरसोय होत होती.
याप्रकरणी युवासेना सहसचिव, शिवसेनेचे माजी नगरसेवक अॅड. मेराज शेख व परळ शाखेचे माजी शाखाप्रमुख रमेश सावंत यांनी बेस्टचे उपमहाव्यवस्थापक प्रवीण शेट्टी यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला. मेराज शेख यांच्या अर्जावर सकारात्मक प्रतिसाद देऊन बस क्रमांक सी- 10 ची मार्गिका शीव रुग्णालयापासून संपूर्ण रफी अहमद किडवाई मार्गावर शिवडी शिवाजी नगर बस स्थानकापर्यंत जुन्या मार्गिकेवर सुरू केली. त्यामुळे रहिवाशांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.



























































