
‘इलेक्शन मॅनेजमेंटच्या नावाखाली फुकटची दारू कोणाला पाजू नका. लोकांना काम करणारे पाहिजे असतात. काम करा आणि मत मागा,’ असे आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भाजप युवा मोर्चा कार्यकर्ता संमेलनामध्ये ते बोलत होते. ’निवडणुकीच्या काळात स्वतःही खा आणि खायला घाला. मात्र, बाकीच्या गोष्टी बंद करा. लोकांना दारू पाजू नका. भाडोत्री लोकांची पक्षाला गरज नाही. इमानदारीने काम करा. नागपूर शहरातील नागरिकांचे जीवन बदला आणि त्यासाठी मत मागा. लोक आपल्याला मत दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
एक फूल, पन्नास माळी
‘ही निवडणूक सोपी आहे. मात्र पाच हजार लोकांनी तिकिटं मागितली आहेत. आमच्या वेळी ‘एक फूल दो माली’ होते, आता ‘एक फूल पच्चास माली’ अशी स्थिती आहे. एक सुंदरी आहे आणि पन्नास लोक म्हणतायत माझे जमवा. प्रत्येक जण म्हणतोय मीच चांगला आहे. आता स्वयंवर होणार आहे. एका खुर्चीवर एकच माणूस बसू शकतो. त्यामुळे ज्याला जनतेचा पाठिंबा आहे, त्याचा विचार करू,’ असे गडकरी म्हणाले.




























































