
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांना ‘चार्ज’ करण्यासाठी आणलेला दोन कोटींचा ‘माल’ आचारसंहिता पथकाने पोलिसांच्या मदतीने जप्त केला आहे. १५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत ठाणे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागासह अन्य यंत्रणांनी धडक कारवाई करत दारू, अमली पदार्थ, शस्त्रास्त्रे, रोकड हस्तगत केली आहे. या धडक कारवाईने मनी मसल पॉवर दाखवून निवडणूक लढणाऱ्या काही उमेदवारांना दणका बसला आहे.
निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू करताच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून धडक मोहीम सुरू केली. आचारसंहिता पथकामध्ये ठाणे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थिर तपास पथके, फ्लाइंग स्क्वॉड व लेखा पथकांनी विविध ठिकाणी कारवाई करत २ कोटी ७५ लाख ९ हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या आचारसंहिता पथकांनी मॉडेला चेकनाका, श्रीनगर, किसननगर, खारीगाव, नाशिक रोड, मुंब्रा, खिडकाळी, डायघर, शीळ रोड, विटावा, मनीषानगर परिसरात कारवाई करून ९ लाख ५४ हजारांची रक्कम जप्त केली. या पथकांनी मोहिमेदरम्यान २ कोटी २८ हजार रुपयांचे ५७ हजार ९३७ किलो अमली पदार्थदेखील जप्त केले आहेत. तसेच ५९ शस्त्रास्त्रे हस्तगत करत ६१९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. निवडणुकीच्या काळात दारूचा पुरवठा रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांच्या मदतीने कारवाई करत गावठी, देशी, बीयर, विदेशी, वाईन, रसायने अशी एकूण २१ लाख ८१ लाखांची १० हजार ६५८ लिटर दारू जप्त करण्यात आल्याची माहिती नोडल अधिकारी भालचंद्र बेहरे यांनी दिली.
सीसीटीव्हीद्वारे करडी नजर
शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी महापालिकेमार्फत सार्वजनिक व खासगी मालमत्तेवरील बेकायदेशीर प्रचार साहित्य हटविण्याची मोहीम राबविण्यात आली असल्याचे नोडल अधिकारी बेहरे यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, निर्भय व पारदर्शक ठेवण्यासाठी सीसीटीव्हीद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार असून आचारसंहिता उल्लंघनावर तत्काळ कठोर कारवाई तत्व केली जाईल अशा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.


























































