प्रजासत्ताक दिनानिमित्त लावलेला स्पीकर अंगावर पडून 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, विक्रोळीतील हृदयद्रावक घटना

सोमवारी संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करत असताना मुंबईतील विक्रोळी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. टागोर नगरमधील आंबेडकर नगर येथे सार्वजनिक कार्यक्रमासाठी लावलेला एक अवजड स्पीकर अंगावर पडल्याने 3 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 जानेवारीनिमित्त आंबेडकर नगरमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या आवाजासाठी परिसरात मोठे आणि जड स्पीकर्स लावण्यात आले होते. ही चिमुकली परिसरात खेळत असताना अचानक एक मोठा स्पीकर तिच्या अंगावर कोसळला. अवजड स्पीकर अंगावर पडल्याने मुलगी गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून, त्यात एका व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे. एक व्यक्ती डोक्यावर मोठे गाठोडे घेऊन जात असताना, त्याचे गाठोडे स्पीकरच्या वायरमध्ये अडकले. गाठोड्याचा हिसका बसल्याने अवजड स्पीकर खाली पडला.

 दुर्दैवाने, त्याच क्षणी ही 3 वर्षांची मुलगी तिथून धावत जात होती आणि तो स्पीकर थेट तिच्या अंगावर पडला. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

12 वर्षांची मुलगी धावत्या ट्रेनमधून पडली; देवदूत बनून धावला खाकी वर्दीतील जवान, थरारक व्हिडीओ व्हायरल