
महानगरपालिका निवडणुकीनंतर राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. याच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आठवड्याभरात 20 सभा घेणार असल्याचे वृत्त आहे. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. माणसं फोडणे, विकत घेणे आणि निवडणुका लढवणे हीच त्यांची लोकसेवा, महाराष्ट्र सेवा आणि महाराष्ट्र धर्म असल्याची टीका संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचार सभा घेत आहेत. त्यांना काम काय आहे? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मंत्रालयात बसून या राज्याचा कारभार करणे अपेक्षित आहे, पण ते 24 तास राजकारण आणि निवडणुकीत गुंतलेले आहेत. ते आठवड्याला 20 काय 50 सभाही घेतील. त्यांच्या हाताशी हेलिकॉप्टर, चार्टर्ड विमान, पैशाने भरलेले कंटेनर आहेत. तुम्ही त्यांची तुलना करू नका. राज्यात सत्तेवर आल्यापासून ते जनतेच्या हिताचे एक तरी काम करू शकले का? फक्त निवडणुका लढवणे, जिंकणे, माणसं फोडणं, विकत घेणे हीच त्यांची लोकसेवा, महाराष्ट्रसेवा आणि महाराष्ट्र धर्म आहे, अशी खरपूस टीका संजय राऊत यांनी केली.
लाल वादळ नाही, हा महाराष्ट्रातील आदिवासींचा उठाव
ते पुढे म्हणाले की, नाशिकवरून हजारो आदिवासी बांधव मुंबईकडे निघाले आहेत. आठ दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी धडक मारली. चंद्रपूर, गडचिरोली येथे आदिवासींची आंदोलन सुरू आहेत. जल-जमीन-जंगल यांच्यावर आदिवासींचा हक्क आहे. महाराष्ट्रात त्याच्यावर उद्योगपतींच्या माध्यमांतून आक्रमण होत आहे. हे सगळे उद्योगपती भाजपचे देणगीदार आहेत. हे लाल वादळ नसून, हा महाराष्ट्रातील आदिवासींचा उठाव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 50 सभा घेण्याऐवजी पालघरचे आदिवासी आणि नाशिकवरून निघालेले हजारो आदिवासी यांच्याशी चर्चा करावी.
पैशाच्या तुफानातही आमचे कार्यकर्ते लढतील
निवडणुका नेते लढत नाहीत. कार्यकर्ते, पदाधिकारी स्थानिक पातळीवर लढत असतात. जिल्हा परिषदेच्या निवडणुका या प्रामुख्याने जिल्ह्यातील प्रमुख नेते, कार्यकर्ते लढतात. पण गेल्या काही काळापासून पैशाचा प्रचंड वापर सुरू आहे. पैशाचे तुफान आलेले आहे. त्याच्याशी सामना करणे कठीण असले तरी आमचे कार्यकर्ते लढतील, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले.
मिंधे गटाला बाळासाहेब नाही तर मोदी, शहा वंदनीय; संजय राऊत यांचा घणाघात
16 लाख कोटींचा हिशेब द्यावा
फडणवीस वकील आहेत आणि मंत्रिमंडळात काही सीए आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या 16 लाख कोटींचा हिशेब दिला पाहिजे. बॅलन्सशीट टॅली व्हायला पाहिजे ना? असेही संजय राऊत म्हणाले. तसेच काही मंत्र्यांनी येणे-जाणे कायम राहावे म्हणून दावोसला घरे घेतल्याचा आरोपही राऊत यांनी केला.
























































