
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपायला अवघा एक दिवस उरला असतानाच, निलंगा तालुक्यातील तांबाळा जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या महिला उमेदवाराचे अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेसने थेट सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.
निलंगा तालुक्यातील आणि औसा विधानसभा मतदारसंघातील तांबाळा जिल्हा परिषद मतदार संघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. येथून काँग्रेस पक्षाच्या वतीने अंजना सुनील चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, 24 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उदगीर येथून त्यांचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे.
अंजना चौधरी या उदगीर येथील बिदर रोड भागात आपल्या मैत्रिणीकडे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यांना घेण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते रणजीत कोकणे तेथे पोहचले होते. कार्यक्रम संपल्यानंतर प्रचाराला जायचे असे ठरले होते. मात्र, रणजीत कोकणे काही वेळासाठी बाहेर गेले असता, काही गुंडांनी अंजना यांना जबरदस्तीने गाडीत घालून पळवून नेले. या घटनेनंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी माध्यमांशी बोलताना सत्ताधारी भाजप आमदाराच्या गुंडांनीच हे अपहरण केल्याचा घणाघाती आरोप केला आहे. निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला करण्यासाठीच हे षडयंत्र रचल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. या प्रकरणी काँग्रेस पक्षाने जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना तातडीने निवेदन दिले आहे.जना चौधरी यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ मुक्त करावे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आणि शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी केली आहे.


























































