Thane news – ठाकरे बंधूंबद्दल अवमानकारक वक्तव्य; माथेफिरूला मनसैनिकांनी दिला चोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीरा रोड येथे राहणाऱ्या माथेफिरूने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोन बंधूंबद्दल सोशल मीडियावर अवमानकारक वक्तव्य केले. सूरज शिर्के असे त्याचे नाव असून मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी घरात घुसून त्याला बेदम चोप दिला. एवढेच नव्हे तर त्याची धिंडही काढली. त्यानंतर ठाकरे बंधूंची बदनामी करणाऱ्या सूरजने आपले कृत्य मान्य करीत सपशेल माफी मागितली आहे.

नालासोपाऱ्यातील आचोळे गावात राहणारा सूरज शिर्के हा गेल्या काही दिवसांपासून फेसबुक तसेच अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरे बंधूंविषयी एकेरी भाषेत उल्लेख करून रिल्स तयार करत होता. एकदा, दोनदा नव्हे तर अनेकदा त्याने अशा प्रकारच्या रिल्स बनवल्या. त्यामुळे सूरज शिर्के याच्याविरोधात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता. सोशल मीडियाचा गैरवापर आणि अभद्र भाषा वापरणाऱ्या मुजोर सूरजचा शोध मनसैनिक घेत होते.

अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बदनामी करणाऱ्या सूरजचा ठावठिकाणा लागताच मनसेचे किरण नकाशे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रोहन चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आचोळे गावातील त्याच्या घरावर थेट धडक दिली. सूरजला घरातून ओढत बाहेर काढले आणि त्याला बेदम चोप देत गावातून धिंड काढली. तसेच त्याला तुळींज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बदनामी आम्ही कदापिही सहन करणार नाही, असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान सूरजने केलेल्या कृत्याबाबत माफी मागितली आहे.