मीरा-भाईंदरच्या महापौरपदी परप्रांतीयच! डिंपल मेहता यांच्या निवडीला मराठी एकीकरण समितीचा विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिक निवडणुकांची रणधुमाळी काही दिवसांपूर्वी पार पडली. “मराठी महापौर” या मुद्द्यावरून मुंबई महानगरपालिकेसह मीरा-भाईंदर महानगरपालिकेत धुमश्चक्री झालेली पाहायला मिळाली. परप्रांतीय महापौर नकोच, अशी मराठी एकीकरण समीतीची ठाम मागणी होती. मात्र, आता मराठी एकीकरण समीतीचा विरोध डावलून मराठी द्वेष्ट्या भाजपने मीरा-भाईंदर महानगरपालिकेत डिंपल मेहता यांना महापौरपदी बसवलं आहे. त्यामुळे मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली असून मीरा-भाईंदरमधील वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे.

महानगरपालिका निवडणुकांची जेव्हा घोषणा झाली तेव्हाच मराठी आणि अमराठी महापौर या मुद्द्यावरून वादंग सुरू झालं होतं. निवडणुका पार पडल्या अन् भाजपने सर्वाधिक जागा जिंकत मीरा-भाईंदर महानगरपालिकेची सत्ता काबीज केली. अमराठी महापौर बसवण्याला मराठी एकीकरण समीतीसह मराठी भाषिकांचा पहिल्यापासून विरोध होता. मात्र, हा विरोध डावलून भाजपने डिंपला मेहता यांना महापौर पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं आणि त्यांच्या बाजूने सर्वाधिक मतदानही झालं. भाजपच्या सर्व 78 नगरसेवकांसह एका अपक्ष नगरसेवकाने डिंपल मेहता यांना मतदान केलं. 79 जणांनी डिंपल मेहता यांच्यासाठी हात वर केल्याने त्याच मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी विराजमान होण्यावर शिक्कामोर्तब झाला. तर उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

भाईंदरवासीयांना मराठी महापौर द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा यापूर्वीच मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिला होता. हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा विषय नसून मराठी माणसांचा विषय आहे. शहराचे मराठीपण टिकवण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात आले आहे. मुंबई गुजरातला मिळावी असे स्वप्न मोरारजी देसाई यांनी बघितले होते. तसाच प्रयत्न भाईंदरमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे बघत असून त्यांचा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा गोवर्धन भगत यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना दिला.