
‘हिंदुस्थान-अमेरिकेतील व्यापार करार ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरणागती आहे. अदानी, अंबानींच्या फायद्यासाठी आणि एपस्टिन फाइल्समधील गुपिते बाहेर येऊ नयेत म्हणून हा करार करण्यात आला आहे. त्यामुळे आयात तिपटीने वाढणार असून हिंदुस्थान अमेरिकेसाठी डम्पिंग ग्राऊंड होणार आहे,’ असा हल्ला काँग्रेसने आज चढवला.
काँग्रेसचे प्रवत्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेतून करारावर भाष्य केले. ‘कालपर्यंत अमेरिका हा हिंदुस्थानचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा व्यापारी भागीदार होता. अनेक दशके हिंदुस्थानने अमेरिकेला मोठ्या प्रमाणात निर्यात केली. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था मजबूत झाली. नव्या व्यापार करारामुळे आपल्याला पाच वर्षांत अमेरिकेतून 500 अब्ज
डॉलरची आयात करावी लागेल. ही आयात तिपटीने जास्त असेल.
…तर पुन्हा टॅरिफ लागणार
आपण रशियाकडून तेल खरेदी केल्यास पुन्हा टॅरिफ लावले जाणार आहे. हे कसले परराष्ट्र संबंध आहेत,’ असा सवाल खेरा यांनी केला.
काय आयात करणार हे सरकार सांगत नाही!
‘केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी हा करार फायद्याचा असल्याचा दावा करतात, पण देशातील शेतकऱयांना, जनतेला हवी असलेली माहिती देत नाहीत. आपण अमेरिकेतून काय आयात करणार नाही, हे गोयल यांनी सांगितले, मात्र काय आयात करणार आहोत हे स्पष्ट केले नाही. हा करार शेतकऱयांचे कंबरडे मोडणारा ठरेल हे पुढील काळात दिसेल,’ असे खेरा म्हणाले.
मैत्री बरोबरीची असायला हवी. एखादा मित्र तुम्हाला रोज दोन चापट्या मारतो. तुम्ही नाराजी दर्शवता. मग तो एक चापटी कमी करतो आणि तुम्ही खूश होता. याला मैत्री म्हणतात का? – पवन खेरा, काँग्रेस प्रवत्ते
हे सरकार आहे की सर्कस?
व्यापार कराराच्या मुद्दय़ावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘या कराराबद्दल प्रश्न विचारले की परराष्ट्र मंत्री हे वाणिज्य मंत्र्यांकडे बोट दाखवतात. वाणिज्य मंत्री म्हणतात की परराष्ट्र मंत्री यावर बोलतील. या मंत्र्यांमध्ये किंवा विभागांमध्ये अंतर्गत काही भांडण आहे का? की दोघांनाही काहीच माहिती नाही? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किमान खुलेपणाने माध्यमांचे प्रश्न तरी ऐकून घेतात. आपल्याकडे तसे काहीच दिसत नाही. हे सरकार आहे की सर्कस?’ असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे हाणला.

























































