
शहरातून अल्पवयीन मुलामुलींची बेपत्ता होत असल्याच्या घटनांमध्ये बाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत कासारवडवली, वर्तकनगर, वागळे इस्टेट व दिवा परिसरातून पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यात दोन सख्ख्या चुलत बहिणींचा समावेश आहे. या वाढत्या घटनांमुळे पालकांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
वर्तकनगर परिसरात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी 6 फेब्रुवारी रोजी बाजारात जाण्यासाठी घरातून बाहेर निघाली. मात्र रात्री उशीर झाला तरी ती घरी परतलीच नाही. तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. दुसरीकडे वागळे इस्टेट परिसरात राहणारी 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी 20 फेब्रुवारी रोजी चिकन आणण्यासाठी घरातून बाहेर पडली आणि अचानक गायब झाली. तिच्या नातेवाईकांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्या बेपत्ता झाल्याची नोंद केली. या तर दिवा पूर्वेत राहणारी 16 वर्षीय मुलगी 20 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाण्यासाठी निघाली. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी परतलीच नाही.
कासारवडवली परिसरात राहणाऱ्या 15 व 12 वर्षांच्या दोन सख्ख्या चुलत बहिणी 21 फेब्रुवारी बाथरूमला जाण्यासाठी घराबाहेर पडल्या मात्र त्या दोघीही घरी परत न आल्याने त्यांच्या पालकांनी कासारवडली पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची नोंद केली. या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.































































