निमित्त – समाजाशी जोडलेले अर्थतज्ञ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दीपक शेडगे

ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. सतत सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून समाजातील तळागाळातील लोकांना आज या वयातदेखील मार्गदर्शन करीत आहेत. 2 मार्चला त्यांचा 80 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त…

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची अलीकडेच भेट झाली. त्यावेळी राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या कार्याची ओळख त्यांच्याशी गप्पा मारताना झाली. प्रसिध्दीपासून दूर राहून सतत काम करणारी काही अपवादात्मक माणसं असतात आणि आजच्या काळात ती दुर्मिळ होत चालली आहेत. अशा दुर्मिळ व्यक्तीपैकीच डॉ. भालचंद्र मुणगेकर हे एक व्यक्तिमत्त्व आहेत.

डॉ. मुणगेकर सर तसे कॉलेज जीवनापासूनच सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते. अगदी स्वतच्या लग्नाच्या दिवशीसुध्दा मुंबईतील भारतमाताजवळ मोर्चात सहभागी झालेले असताना त्यांच्या कित्येक जवळच्या मित्रमंडळीनी त्यांना पाहिलेले आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य आणि राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी आतापर्यंत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. खासदार निधीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘देशातील 250 राज्यसभा सदस्य आणि 543 लोकसभा सदस्य अशा एकूण 793 खासदारांना प्रत्येकी 5 कोटी रुपयांप्रमाणे एकूण तीन हजार सहाशे पासष्ट कोटी रुपये खासदार निधी दिला जातो. या निधीचा सर्व खासदारांकडून योग्यप्रकारे, प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे उपयोग करण्यात आला तर देशातील गरीब लोकांच्या कल्याणाची सर्व कामे चांगल्या प्रकारे करता येतील. त्याप्रकारे ती कामे होतातच अशी आज शंभर टक्के खात्री देता येत नाही. त्याची अनेक कारणे आहेत. परंतु ही कामे अधिक पारदर्शक आणि योग्य पध्दतीने झाली पाहिजेत.’ त्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीत खासदार निधीतून केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. त्यांनी आपल्या खासदार निधीचा उपयोग आतापर्यंत देशातील मागासलेले विभाग, गरजू समाज घटक, राष्ट्रीय आपत्तीने त्रस्त झालेले घटक, संपूर्ण देशातील तालुका, खेडी इत्यादीसाठी केलेला आहे. अगदी तामीळनाडूतील नामकळमपासून तो राजस्थानातील पेरीगढवालपर्यंत. त्यांनी आपल्या खासदार निधीसाठी कोकण विभाग त्यांनी नोडल जिल्हा म्हणून निवडला होता. वर्षातून 2.5 कोटी रुपये सिंधुदुर्गातील वेगवेगळ्या विकास कामावर आपल्या कारकिर्दीत खर्च केले आहेत. वार्षिक एकूण खासदार निधीपैकी 75 टक्के कोकणसाठी आणि त्यातले 50 टक्के एकटय़ा सिंधुदुर्ग जिह्यासाठी डॉ. मुणगेकर यांनी खर्च केले आहेत. त्यामध्ये शिक्षण (वर्ग खोल्या, सभागृह बांधणी), आरोग्य, वाचनालये, इंधन विहिरी रस्ते, सौरदीप (200 गावांना), स्मशानभूमी, नळ योजना, स्वच्छतागृह, लॅबोरेटरी तसेच मिठबाव बाजारशेड पक्की करण्यासाठी व एससी/एसटी/ओबीसी यांच्यासाठी केलेल्या कामांचा अंतर्भाव आहे. मिठबावच्या बाजारात उघडय़ावर बसून आपले वडील सुपारी विकत होते ही आठवण सांगताना डॉ. मुणगेकर क्षणभर अंतर्मुख झाले आणि ती आठवण मनाशी ठेवूनच मिठबाव बाजार शेड पहिल्या प्रथम पक्की बांधण्याचा निर्णय आपण घेतला असंही ते म्हणाले.

इ.सन 2009 मध्ये कोकणामध्ये मत्स्य विद्यापीठ स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॉ. मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समिती नियुक्ती केली होती. दोन वर्षे सखोल अभ्यास करून कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ स्थापन करण्याची समितीने शिफारस सरकारला केली होती. पण आजपर्यंत अहवालावर महाराष्ट्र शासनाने कोणतीही कारवाई केली नाही, याविषयी ते आजही खेद व्यक्त करतात.

जाती व अस्पृश्यता निर्मुलन, स्त्राr-पुरुष समानता, धर्म निरपेक्षता, लोकशाही समाजवाद आणि मानवतावाद या पाच मूल्यांवर अधिष्ठित असे जीवन डॉ. मुणगेकर जगले. आयुष्यभर या पाच मूल्यांच्या संदर्भात कोणतीही तडजोड न करता स्वतचे वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवरील जीवन ते जगलेच, पण आपल्या सामाजिक कार्यक्षेत्रातदेखील याच मूल्यांच्या आधारावर त्यांनी मार्गक्रमण केले. सत्ताधाऱयांसमोर ‘लांगूनचालन’ न करता आणि तडजोड न करता पुढे चालत राहणाऱय्या डॉ. भालचंद्र मुणगेकर सरांचे कार्य निश्चितच आदर्शवत आहे.

 कोकणासाठी काय करता येईल याचा सातत्याने शोध घेणारे डॉ.मुणगेकरांचे मन अजूनही कोकणच्या विकासासाठी भरगच्च कार्यक्रम आखता येईल का या विचारात व्यग्र आहे असंही त्यांच्याशी बोलताना जाणवलं. मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिह्यातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक, अध्यापक, विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना कोकणाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक इ. प्रश्नांचा मराठी भाषेत शास्त्राrय व चिकित्सक पध्दतीने अभ्यास करून योग्य उपाय-कार्यक्रम सुचवावेत आणि कोकणाचा सर्वागीण विकास अधिक गतिमान करावा, असा डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा आग्रह आहे.
(लेखक साहित्यिक आणि कवी आहेत)