
>> भावेश ब्राह्मणकर
दर चार वर्षांनी भरणारा हिवाळी ऑलिंपिक हा जागतिक महोत्सव हवामान बदलामुळे चांगलाच खिंडीत सापडला आहे. इटलीत नुकत्याच झालेल्या या स्पर्धांमध्ये त्याची प्रचीती आली. आगामी काही वर्षांत या स्पर्धा होतील की नाही, अशी शंका आहे.
खेळ आणि निसर्ग यांचे नाते अतूट आहे. विशेषत हिवाळी ऑलिंपिकच्या बाबतीत. उंच डोंगररांगा, गोठवणारी थंडी आणि चकाकणारा नैसर्गिक पांढराशुभ्र बर्फ हे या खेळांचे मुख्य आकर्षण असते. यंदा इटलीच्या मिलान-कोर्टिना येथे 2 ते 22 फेब्रुवारी दरम्यान हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा झाल्या. यानिमित्ताने गंभीर वास्तव समोर आले आहे. वाढत्या जागतिक तापमानामुळे आता हिवाळी ऑलिंपिकचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ‘बीबीसी फ्युचर’, ‘टाइम’ आणि ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ यांच्या अहवालांनुसार, भविष्यात हिवाळी खेळ खेळणे अधिक कठीण होणार असून, नैसर्गिक बर्फाची जागा आता ‘कृत्रिम बर्फा’ने घेतली आहे. हिवाळी ऑलिंपिक ही बर्फ आणि हिमावर खेळल्या जाणाऱया क्रीडा प्रकारांची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून ती आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून आयोजित केली जाते.
पहिली हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा 1924 साली चामोनिक्स येथे झाली. त्यात 16 देशांनी सहभाग घेतला. त्या स्पर्धेचे अधिकृत नाव होते आंतरराष्ट्रीय हिवाळी क्रीडा सप्ताह. नंतर ऑलिंपिक समितीने तिला पहिल्या हिवाळी ऑलिंपिकचा दर्जा दिला. प्रारंभी स्कीइंग, फिगर स्केटिंग, आइस हॉकी, बॉबस्लेड यांसारखे खेळ होते. विशेष म्हणजे, फिगर स्केटिंग आणि आइस हॉकी हे खेळ 1908 आणि 1920 च्या उन्हाळी ऑलिंपिकमध्येही झाले होते. नंतर ते हिवाळी स्पर्धांचा भाग बनले. 1994 पासून हिवाळी आणि उन्हाळी ऑलिंपिक दोन वर्षांच्या अंतराने आयोजित होऊ लागले. 2022 मध्ये बीजिंग येथे हिवाळी ऑलिंपिक झाले. हिवाळी आणि उन्हाळी असे दोन्ही ऑलिंपिक आयोजित करणारे बीजिंग हे पहिले शहर ठरले.
आज हिवाळी ऑलिंपिकमध्ये स्कीइंगच्या विविध प्रकारांपासून स्नोबोर्डिंग, बायथलॉन, कर्लिंग, ल्यूज यांसारखे अनेक आधुनिक खेळ समाविष्ट आहेत. अलीकडच्या काळात हवामान बदल, नैसर्गिक बर्फाची कमतरता आणि कृत्रिम बर्फावर वाढते अवलंबित्व ही मोठी आव्हाने ठरत आहेत. त्यामुळे भविष्यात हिवाळी ऑलिंपिकच्या आयोजन पद्धतीत बदल अपेक्षित आहेत.
हिवाळी ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱया खेळाडूंना आता केवळ प्रतिस्पर्ध्यांशीच नाही, तर अनपेक्षित हवामानाशीही लढावे लागत आहे. पूर्वी हिवाळी खेळांच्या ठिकाणी कडाक्याची थंडी असायची, ज्यामुळे बर्फाचा पृष्ठभाग कडक आणि स्थिर राहायचा. मात्र, आता तापमानात होणाऱया वाढीमुळे बर्फ मऊ (Slushy) होत आहे. जेव्हा बर्फ मऊ होतो, तेव्हा स्किईंग किंवा स्नोबोर्डिंग करणाऱया खेळाडूंना वेग राखणे कठीण जाते. इतकेच नाही तर, मऊ बर्फामुळे खेळाडूंचा तोल जाण्याची आणि गंभीर दुखापत होण्याची शक्यता वाढली आहे.
2022 च्या बीजिंग हिवाळी ऑलिंपिकमध्ये जवळपास 100 टक्के कृत्रिम बर्फाचा वापर करण्यात आला होता. 2026 च्या इटलीतील खेळांमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. नैसर्गिक बर्फाची कमतरता भरून काढण्यासाठी ‘स्नो गन्स’च्या सहाय्याने बर्फ तयार केला जातो. कृत्रिम बर्फ तयार करण्यासाठी लाखो गॅलन पाण्याची गरज असते. ज्या भागात आधीच पाण्याची टंचाई आहे, तिथे हा पाण्याचा वापर स्थानिक पर्यावरणावर ताण निर्माण करतो. शिवाय पाण्याचे बर्फात रूपांतर करण्यासाठी काही वेळा विशिष्ट रसायने मिसळली जातात, जी वितळल्यानंतर जमिनीतील माती आणि वनस्पतींसाठी घातक ठरू शकतात. त्याचबरोबर बर्फ तयार करणाऱया मशिन चालवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वीज लागते, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढते. म्हणजेच, ज्या हवामान बदलामुळे बर्फ कमी झाला आहे, तोच हवामान बदल या प्रक्रियेमुळे अधिक तीव्र होण्याची भीती आहे. इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीसमोर सर्वात मोठे आव्हान हे आहे की, हिवाळी ऑलिंपिक आयोजित करण्यासाठी योग्य शहरेच उरलेली नाहीत. एका अभ्यासानुसार, जर कार्बन उत्सर्जनाचा वेग असाच राहिला, तर 21 व्या शतकाच्या अखेरीस पूर्वी हिवाळी ऑलिंपिक आयोजित केलेल्या 21 शहरांपैकी केवळ एकच शहर (सप्पोरो, जपान) खेळ आयोजित करण्यास सक्षम असेल.
हिवाळी ऑलिंपिक केवळ खेळांपुरते मर्यादित नसते, तर त्यावर त्या देशाची अर्थव्यवस्था आणि पर्यटन अवलंबून असते. इटलीसारख्या देशांसाठी हिवाळी पर्यटन हा उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. मात्र, बर्फाच्या कमतरतेमुळे स्की रिसॉर्ट्सना आता कृत्रिम बर्फावर कोटय़वधी रुपये खर्च करावे लागत आहेत. यामुळे खेळांचे आयोजन करणे दिवसेंदिवस महागडे होत चालले आहे. सामान्यांसाठी हे खेळ पाहणे किंवा त्यात सहभागी होणे खर्चिक बनत आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या मते, आता केवळ खेळ वाचवून चालणार नाही, तर पर्यावरणाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. जसे की, सौर आणि पवन ऊर्जेवर चालणारी बर्फ बनवणारी यंत्रे वापरणे. बर्फ वितळल्यानंतर ते पाणी पुन्हा साठवून पुढील वापरासाठी सुरक्षित ठेवणे. खेळांच्या तारखांमध्ये बदल करून, ज्या काळात थंडी सर्वाधिक असते, अशाच वेळी स्पर्धा आयोजित करणे हे करता येऊ शकते.
जेव्हा नैसर्गिक बर्फ नसतो, तेव्हा खेळाडूंना एका अरुंद ‘बर्फाच्या पट्टीवर’ खेळावे लागते, ज्याच्या आजूबाजूला केवळ दगड किंवा माती असते. अशा परिस्थितीत थोडीही चूक जीवघेणी ठरू शकते. यामुळे खेळाडूंमध्ये मानसिक दडपण वाढत आहे. अनेक व्यावसायिक खेळाडूंनी आता हवामान बदलाच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे, कारण त्यांचे भविष्य या खेळांशी जोडलेले आहे. हिवाळी ऑलिंपिकचे अस्तित्व टिकवण्यासाठी आता केवळ तंत्रज्ञान पुरेसे नाही, तर जागतिक स्तरावर हवामान बदलाच्या विरोधात ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. 2026 चे मिलान-कोर्टिना ऑलिंपिक हे जगासाठी एक धोक्याची घंटा समजले गेले. जर आपण निसर्गाचे संतुलन राखण्यात अपयशी ठरलो, तर कदाचित भविष्यातील पिढय़ांना ‘हिवाळी ऑलिंपिक’ हे केवळ इतिहासाच्या पुस्तकात किंवा इनडोअर स्टेडियममध्येच पाहायला मिळेल. निसर्गाच्या लहरीपणापुढे मानवी तंत्रज्ञान किती काळ टिकणार, हाच खरा प्रश्न आहे. हिवाळी खेळ वाचवणे म्हणजे केवळ बर्फ वाचवणे नव्हे, तर आपल्या पृथ्वीचे थंड राहणे सुनिश्चित करणे असेच आहे.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत)



























































