
अवघ्या जगाचे लक्ष अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाकडे लागलेले असताना दुसरीकडे पाकिस्तानने सीमेवर कुरापती सुरू केल्या आहेत. पाकिस्तानने ड्रोनच्या मदतीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र डोळ्यात तेल घालून बसलेल्या हिंदुस्थानी लष्कराने पाकड्यांचा हा नापाक डाव हाणून पाडला.
जम्मू-काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने आगळीत करण्याचा प्रयत्न केला. रविवारी पहाटे पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानी ड्रोनने हिंदुस्थानची हद्द ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानच्या सतर्क जवानांनी गोळीबार करत हे ड्रोन पिटाळून लावले. गेल्या तीन दिवसातील घुसखोरीचा हा तिसरा प्रयत्न असल्याने सीमेवर तणाव चांगलाच वाढला आहे.
‘इकोनॉमिक्स टाइम्स‘ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी 6 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास पुंछमधील दिगवार सेक्टरमध्ये एलओसीवर तैनात जवानांना एक संशयास्पद ड्रोन घिरट्या घालताना दिसले. हे ड्रोन हिंदुस्थानच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. पुढील धोका ओळखून जवानांनी ड्रोनवर गोळीपार केला. यामुळे हे ड्रोन पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने गेले.
दरम्यान, गेल्या तीन दिवसात पाकिस्तानी ड्रोनने दुसऱ्यांदा घुसखोरीचा प्रयत्न केला. याआधी 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी ड्रोनने एलओसी पार करत हिंदुस्थानच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. या ड्रोनवर जवानांनी गोळीबार केला. तेव्हाही हे ड्रोन पाकिस्तानकडे माघारी परतले.
विशेष म्हणजे याआधीही अनेकदा पाकिस्तानी ड्रोनने एलओसी पार करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळले होते. या ड्रोनच्या मदतीने सीमेपारच्या तळांवरील दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याचा आणि सीमेवर त्यांना हत्यारे पुरविण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या भागामध्ये गस्त वाढवण्यात आलेली आहे.

























































