
अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आणि सर्वोच्च नेते खमेनी यांच्या मृत्यूनंतर जग मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. इराणने इस्रायल आणि सौदी अरेबियासह अनेक मध्य पूर्वेतील देशांमध्ये अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करून क्षेपणास्त्रे डागली. इराणने अमेरिकेचे तळ असलेल्या आखाती देशांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणने सौदीवरही क्षेपणास्त्रे डागली आहेत. सौदी-पाकिस्तान संरक्षण करारामुळे पाकिस्तानच्या संभाव्य भूमिकेबद्दल जागतिक चर्चा होत आहे.
पाकिस्तान सौदी अरेबियाला मदत करण्यासाठी पुढे येईल का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. गेल्या वर्षी पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये करार झाल्यामुळे इराणी हल्ल्यांनंतर हा प्रश्न जागतिक स्तरावर उपस्थित केला जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सौदी अरेबिया आणि अण्वस्त्रधारी पाकिस्तान यांच्यात “स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अॅग्रीमेंट” करार झाला होता. कोणत्याही देशाचे नाव न घेता, करारात म्हटले होते की, कोणत्याही देशाविरुद्धचा कोणताही हल्ला दोघांविरुद्धचा हल्ला मानला जाईल.
पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये अनेक दशकांपासून अनौपचारिक संरक्षण संबंध आहेत. परंतु हा नवीन करार इस्लामिक देशांमधील सुरक्षा सहकार्य औपचारिक करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात होते. आता प्रश्न उद्भवतो पाकिस्तान सौदी अरेबियाला मदत करण्यासाठी पुढे येईल का? पाकिस्तान स्वतः शेजारील अफगाणिस्तानशी युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अलीकडेच, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर अनेक हल्ले केले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तान आणि असीम मुनीर यांची चांगलीच कोंडी झाली आहे. अफगाणिस्तानशी संघर्ष वाढत असताना ते सौदीच्या मदतीसाठी जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
सौदी अरेबियाचे दोन प्रमुख शत्रू इराण आणि इस्रायल आहेत. सौदी अरेबिया आपल्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. ग्लोबल फायरपॉवर डेटाबेसनुसार, १४५ देशांपैकी सौदी अरेबिया २४ व्या क्रमांकावर आहे, तर त्याचा मित्र पाकिस्तान १२ व्या क्रमांकावर आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर हिंदुस्थान हा जगातील चौथ्या क्रमांकाची लष्करी शक्ती आहे.

























































