
मध्य पूर्वेत अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण मध्य पूर्व भागात हवाई क्षेत्रावर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर झाला असून अनेक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. वाढत्या सुरक्षा संकटाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
रविवारी परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) प्रवास निर्बंधांमुळे हिंदुस्थानात अडकलेल्या परदेशी नागरिकांसाठी विशेष अॅडव्हायजरी जारी केली. ज्यांच्या व्हिसाची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे, त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून व्हिसा मुदतवाढ प्रक्रियेची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
उड्डाणांची अनुपलब्धता असल्याने हजारो प्रवासी आपल्या देशात परतू शकत नसल्याची शक्यता आहे. वैध व्हिसा संपत असलेल्या प्रवाशांसाठी ही अॅडव्हायजरी मोठा दिलासा मानली जात आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, आपला मुक्काम कायदेशीर ठेवण्यासाठी आवश्यक सरकारी प्रक्रिया तात्काळ पूर्ण कराव्यात.
सर्व प्रादेशिक FRRO कार्यालये (Foreigners Regional Registration Office) मदतीसाठी सज्ज असल्याचेही मंत्रालयाने सांगितले आहे. संबंधित अधिकारी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देतील. उड्डाणे बंद असल्यामुळे नेमके किती परदेशी पर्यटक हिंदुस्थानात अडकले आहेत, याबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि उड्डाणांचे संकट
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर मिडल-ईस्टमध्ये तणाव अधिकच वाढला आहे. त्याचा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला असून उड्डाणांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.
Air India ने रविवारी नियोजित असलेल्या आणखी 22 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या संकटामुळे आतापर्यंत एअर इंडियाची एकूण 50 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहेत.
सध्याच्या घडीला प्रवाशांनी अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे आणि आपल्या उड्डाणाची अद्ययावत माहिती संबंधित विमान कंपनीकडून तपासूनच पुढील नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

























































