कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला निधीची नव्हे, राजकीय इच्छाशक्तीची कमतरता; हर्षवर्धन सकपाळ यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत निधीची नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीची कमतरता असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केली. कसबा येथे भव्य व दिव्य स्मारक उभारावे, अशी मागणी स्थानिक स्तरावर सातत्याने होत असतानाही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सकपाळ म्हणाले की, संभाजी महाराजांचे कार्य व विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पालकमंत्री व इतर नेते स्मारकाबाबत घोषणा करतात. मात्र प्रत्यक्षात काम होत नसल्याने जनतेत नाराजी आहे. दिलेला शब्द पाळून स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाची घोषणा झाली. मात्र ते अद्याप पूर्णत्वास आलेले नाही. त्याचप्रमाणे कसबा येथील संभाजी महाराज स्मारकाचीही अवस्था होऊ नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांसह अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिली असून इतर भागांप्रमाणे येथेही विकास व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या स्मारकासाठी निधीची अडचण नसून राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जाणवत असल्याचे सकपाळ यांनी स्पष्ट केले. यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, उत्तर विभागाच्या सोनलक्ष्मी घाग, संगमेश्वर तालुका अध्यक्ष काशिनाथ वाजे, माजी तालुका अध्यक्ष फैज पाटणकर, मुरलीधर बोरसुतकर, चंद्रकांत कदम आदी उपस्थित होते.