
लग्नासंदर्भातील ज्योतिषाच्या भाकितामुळे तणावात असलेल्या 27 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बंगरुळूत ही धक्कादायक घटना घडली आहे.
तरुणीचे नाव विद्याज्योती असून तिचे दुसऱ्या जातीतील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंबांनी या विवाहाला संमती दिली होती.
प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तिच्या पालकांनी एका ज्योतिषाचा सल्ला घेतला होता. त्या ज्योतिषाने लग्नानंतर दोन वर्षांनी पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे विभक्त होण्याची शक्यता असल्याचे भाकित केले होते. हे टाळण्यासाठी नऊ दिवसांचा धार्मिक विधी करण्याचा सल्ला देण्यात आला होता आणि कुटुंबीयांनी तो विधी सुरूही केला होता.
मात्र, विधीच्या नवव्या दिवशी, पालक घरी नसताना विद्याज्योतीने आपल्या खोलीत जाऊन छताच्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. कुटुंबीयांनी विद्याज्योतीच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. पण खुप वेळानंतरही तिने दार न उघडल्याने कुटुंबीयांना चिंता वाटली. त्यानंतर तिच्या वडिलांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्माक मृत्यूची नोंद केली असून याबाबत तपास सुरू केला आहे.
























































