
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स यांच्या हिंदुस्थान दौऱ्यादरम्यान केंद्र सरकारने अत्यंत सावध पवित्रा घेतल्याचे समोर आले आहे. लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या जेफ्री एपस्टीन याच्याशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने वाणिज्य मंत्रालयाला बिल गेट्स यांच्यासोबत कोणतीही कॅबिनेट स्तरावरील बैठक न घेण्याचा सल्ला दिला होता. यामुळे फिक्कीच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित एक महत्त्वाचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला आहे.
गेल्या महिन्यात बिल गेट्स हिंदुस्थान दौऱ्यावर आले होते. 19 फेब्रुवारी रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत ‘फिक्की’च्या एका कार्यक्रमात ते सहभागी होणार होते. मात्र, ऐनवेळी परराष्ट्र मंत्रालयाच्या अमेरिका विभागाने (AMS) या बैठकीबाबत आक्षेप नोंदवला. सध्याच्या राजकीय स्थितीचा विचार करता वाणिज्य मंत्र्यांनी बिल गेट्स यांची भेट घेणे किंवा त्यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित राहणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट निर्देश परराष्ट्र मंत्रालयाने दिले होते. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.
जेफ्री एपस्टीन याच्यावर अल्पवयीन मुलींच्या तस्करीचे आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते. 2019 मध्ये तुरुंगात असताना त्याने आत्महत्या केली होती. अलिकडेच या प्रकरणाशी संबंधित काही गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक झाली आहेत. यामध्ये बिल गेट्स यांचे नाव आल्याने जागतिक स्तरावर त्यांच्यावर टीका होत आहे. याचाच सर्वांगीण विचार करून परराष्ट्र मंत्रालयाने खबरदारी घेण्याचे ठरवले.
दरम्यान, यानंतर बिल गेट्स यांनी 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मधूनही माघार घेतली. तसेच गेट्स फाउंडेशनने एक निवेदनही जारी केले. एआय समिटच्या मुख्य विषयांवरून लक्ष विचलित होऊ नये, म्हणून गेट्स यांनी कीनोट भाषणातून नाव मागे घेतले आहे. मात्र, हिंदुस्थानच्या आरोग्य आणि विकास क्षेत्रातील कामासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच बिल गेट्स यांनी कधीही जेफ्री एपस्टीनसोबत आर्थिक व्यवहार किंवा भागीदारी केलेली नाही, असेही स्पष्ट केले.
एपस्टीन प्रकरणावरून बिल गेट्स यांना पश्चाताप; समोर आलेल्या ईमेलवर दिली स्पष्ट प्रतिक्रिया


























































