इराण-इस्रायल युद्ध लवकरच संपेल, पण अंतिम विजयापर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांचे सूचक विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील युद्ध लवकरच संपण्याची शक्यता व्यक्त केली आहे. असे असले तरी तरी हे हल्ले नेमके कधी थांबतील याबाबत स्पष्ट कालमर्यादा दिली नाही. मध्यपूर्वेतील या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि तेलबाजार हादरले आहेत.

फ्लोरिडातील मियामीजवळील डोरल नॅशनल गोल्फ क्लब येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मला वाटतं युद्ध लवकरच संपेल. खूप लवकर.” इराणची लष्करी ताकद जवळजवळ संपुष्टात आल्याचा दावा करत त्यांनी “त्यांचे नेतृत्वही नष्ट झाले आहे,” असे सांगितले.

यापूर्वी CBS न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी अमेरिकन-इस्रायली कारवाई “जवळपास पूर्ण झाली आहे” असे म्हटल्याने जागतिक शेअर आणि तेल बाजारात सकारात्मक प्रतिक्रिया दिसून आली.

‘अंतिम विजय’पर्यंत कारवाई सुरू राहणार

ट्रम्प यांनी मात्र इराणच्या धर्माधिष्ठित सत्तेविरुद्ध “अंतिम विजय” मिळवण्याची भूमिका कायम ठेवली आहे. गेल्या आठवड्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या हत्येनंतर त्यांच्या मुलाची नवीन प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, गरज पडल्यास पुढील हल्ल्यांसाठी इराणमधील काही महत्त्वाचे लक्ष्य, जसे की देशाची वीज व्यवस्था (इलेक्ट्रिकल ग्रिड), अजूनही राखून ठेवण्यात आली आहेत.

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अडथळा आणल्यास कठोर कारवाई

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलपुरवठ्यावर अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिकेकडून “अकल्पनीय” मोठा हल्ला केला जाईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. “इराणने तेलपुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही इतका कठोर हल्ला करू की त्या प्रदेशातून कोणीही पुन्हा सावरू शकणार नाही,” असे ट्रम्प म्हणाले. दरम्यान, अमेरिकन काँग्रेसची मंजुरी न घेता सुरू असलेल्या या कारवाईला ट्रम्प यांनी वारंवार ‘युद्ध’ऐवजी ‘मोहीम’ असे संबोधले आहे. इराणमध्ये सत्ताबदल घडवून आणण्याचा अमेरिकेचा उद्देश आहे का, याबाबत ट्रम्प प्रशासनाकडून विरोधाभासी संदेश दिले जात असल्याची टीका होत आहे.

नवीन इराणी नेतृत्वावर भाष्य

इराणचे नवीन नेते मोजतबा खामेनी यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न विचारल्यावर ट्रम्प यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र त्यांची नियुक्ती “चांगली नाही” असे ते म्हणाले.

ट्रम्प यांनी यापूर्वी व्हेनेझुएलाच्या संदर्भात जसे बोलले होते तसेच इराणच्या नव्या नेत्याच्या निवडीतही अमेरिकेची भूमिका असावी, असे संकेत दिले होते. मात्र त्यांनी बाहेरील व्यक्तीऐवजी देशांतर्गत नेतृत्वालाच प्राधान्य दिले पाहिजे, असेही सांगितले.

पुतिनशी सकारात्मक चर्चा

ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी युक्रेन आणि इराण युद्धाबाबत सकारात्मक फोनवर चर्चा झाल्याचे सांगितले. “मध्यपूर्वेत परिस्थिती सुधारण्यासाठी पुतिन मदत करू इच्छितात,” असे ट्रम्प म्हणाले.

CBS न्यूजशी बोलताना ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांमुळे इराणची लष्करी क्षमता जवळपास संपली आहे. “त्यांच्याकडे आता नौदल नाही, संवाद व्यवस्था नाही, हवाईदल नाही. क्षेपणास्त्रे कमी झाली आहेत आणि ड्रोन उत्पादन केंद्रे नष्ट झाली आहेत,” असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांच्या मते युद्धासाठी त्यांनी सुरुवातीला 4 ते 5 आठवड्यांचा कालावधी गृहित धरला होता; मात्र कारवाई त्यापेक्षा अधिक वेगाने पुढे गेली आहे. मात्र गेल्या शुक्रवारीच ट्रम्प यांनी इराणची ‘बिनशर्त शरणागती’ हीच युद्ध संपवण्याची अट असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सोशल मीडियावर “लढाईची सुरुवातच झाली आहे” असे म्हटल्याने पुढील संघर्षाची शक्यता कायम असल्याचे संकेत मिळत आहेत. डोरल येथे रिपब्लिकन नेत्यांसमोर बोलताना ट्रम्प म्हणाले, “आम्ही अनेक बाबतीत आधीच जिंकले आहोत, पण अजून पूर्णपणे विजय मिळालेला नाही.”