भयंकर.. व्हेंटिलेटरवरील वृद्धेला उंदराने कुरतडले; अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू; सरकारच्या अब्रूची लक्तरे निघाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाईंदर पश्चिमेतील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयातील आयसीयूत उपचार घेणाऱ्या एका वृद्धेला उंदराने कुरतडल्याची भयंकर घटना आज घडली. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत अतिरक्तस्त्र्ाावामुळे त्या वृद्धेचा अखेर मृत्यू झाला. या घटनेने सरकारी रुग्णालयातील बेफिकीर कारभार चव्हाटय़ावर आला असून सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

मीरा रोड येथील प्लेझंट पार्क येथे राहणाऱ्या सुहासिनी माठेकर (89) यांना आरोग्याच्या तक्रारींमुळे भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात दाखल करून व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी सुहासिनी माठेकर यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी आयसीयूत गेले असता त्यांना प्रचंड धक्का बसला. माठेकर यांच्या बेडजवळून उंदीर पळून गेल्याचे त्यांना दिसले. बेडवर व फरशीवर रक्ताने माखलेली उंदराची पावले स्पष्टपणे उमटली होती. उंदराने सुहासिनी यांचा हात कुरतडल्याने त्यातून रक्त वाहात होते. अतिरक्तस्त्र्ााव झाल्याने अखेर सुहासिनी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कारणेदाखवा नोटीस, डॉक्टर, नर्सेस कार्यमुक्त; चौकशी समिती स्थापन

या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने डय़ुटीवरील डॉक्टर आणि नर्सेसना कारणेदाखवा नोटीस बजावत त्यांना तत्काळ कार्यमुक्त केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक व मीरा-भाईंदर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाफर तडवी यांनी दिली. या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केल्याचेही डॉ. तडवी यांनी सांगितले.

शिवसेनेची रुग्णालयावर धडक

ही घटना कळताच शिवसैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी  पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयावर धडक देत माठेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. आयसीयूत घुसून उंदीर रुग्णांना कुरतडतात ही वैद्यकीय सेवेला लांच्छन असलेली घटना आहे. या घटनेला जबाबदार असलेले रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाफर तडवी ऑनडय़ुटी डॉक्टर शंतनु पुंडगीर आणि अधिपरिचारिका नमिता भोनर यांना तत्काळ कार्यमुक्त करा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक नीलम ढवण, उपजिल्हाप्रमुख सुभाष केसरकर, विधानसभा संघटक सुप्रिया घोसाळकर, उपजिल्हा संघटक प्राची पाटील, क्षमा गांधी, ग्राहक संरक्षण कक्षाचे सदानंद घोसाळकर, शहरप्रमुख प्रशांत सावंत, शहर संघटक श्रेया साळवी, शिवानी देसाई, उपशहरप्रमुख शेखर पाटील, उपशहर संघटक नीलम देसाई, विभागप्रमुख प्रदीप मोरे, सत्यवान दळवी, विपीन पटेल, यतिन तावडे, सानिका नाईक, नेहा गुजर, सुजाता निकम यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

अजब तर्कट.. आजूबाजूला सुरू असलेल्या बांधकामांमुळे उंदीर रुग्णालयात घुसले

रुग्णालयात उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतंत्र औषध फवारणीचे पंत्राट दिले आहे. मात्र आजूबाजूला अनेक इमारतींची बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे तेथील बिळांमध्ये असलेले उंदीर वर आले आणि ते रुग्णालयात घुसले असावेत, असे अजब तर्कट जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जाफर तडवी यांनी मांडले.