पंढरपुरात चैत्री यात्रेसाठी भाविकांना व्यापक सोई-सुविधा देणार; गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चैत्र शुद्ध एकादशी अर्थात कामदा एकादशीनिमित्त दरवर्षी भरत असलेली चैत्री यात्रा यावर्षी रविवार (दि.२९ मार्च रोजी) होत आहे. यात्रेचा कालावधी दि.२३ मार्च ते दि.०२ एप्रिल असा राहणार आहे. यात्रेस येणाऱ्या भाविकांसाठी व्यापक सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजता श्री विठ्ठल-रूक्मिणी भक्तनिवास येथे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची सभा झाली. या सभेमध्ये चैत्री यात्रेच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यात्रेदरम्यान मंदिर समितीशी संबंधित सर्व प्रथा-परंपरांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. वाढते तापमान लक्षात घेऊन दर्शनरांगेतील भाविकांसाठी थंड व शुद्ध पिण्याचे पाणी, लिंबू सरबत, पंखे व कुलर व्यवस्था, आरोग्य सेवा स्टॉल तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. माघ यात्रेतील गर्दीचा अनुभव लक्षात घेऊन यंदा चैत्री यात्रेसाठी दहा वॉटरप्रूफ पत्रा शेड उभारण्यात येणार आहेत. भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा व टोकन दर्शन सुविधा यात्रेदरम्यान बंद ठेवण्यात येणार असून व्हीआयपी दर्शनावर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांच्या सोयीसाठी दर्शनाची वेळ वाढवून सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरांच्या जतन, संवर्धन व जीर्णोद्धार कामाचा आढावा घेण्यात आला. मंदिर संवर्धन व श्रींच्या मूर्ती संवर्धनाबाबत सल्लागार परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. दि.१७ मे ते दि.१५ जून या कालावधीत येणाऱ्या अधिकमासातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन भाविकांसाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जून २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील जमा-खर्चास मंजुरी देण्यात आली. श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र अरण येथे नेण्याबाबत सल्लागार परिषदेचा सल्ला घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रणिताताई भालके या मंदिर समितीच्या पदसिद्ध सदस्य असून त्यांची ही पहिलीच बैठक असल्याने सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे यांना “राजा शिवछत्रपती समाजभूषण” पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव सभेत पारित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

या सभेला सभेस शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, प्रणिताताई भालके, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक संदेश भोसले, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, सर्व खाते प्रमुख, पुरातत्व विभागाचे डॉ. विलास वाहणे, विद्युत विभागाचे श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे तसेच जतन-संवर्धन कामाचे ठेकेदार उपस्थित होते.