आनंद जाळ्यात मावेना… देवगड समुद्रकिनारी कोकर मासे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील मिठमुंबरी समुद्रकिनारी मोठय़ा प्रमाणात कोकर मासे आढळले आहेत. हवामानातील बदल आणि तांत्रिक मासेमारी याच्या आक्रमणामुळे पारंपरिक मासेमारी विस्कळीत झाली आहे. विस्कळीत झालेल्या पारंपरिक मासेमारीच्या सध्याच्या काळात मोठय़ा प्रमाणात मासळी मिळाली ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याने या मिळालेल्या बंपर मासळीमुळे मच्छीमार आनंदित झाले आहेत.

देवगड तालुक्यातील मिठमुंबरी समुद्रकिनारी मच्छीमार समुदायाने त्यांच्या पारंपरिक जाळ्यात कोकर हे मासे पकडले आहेत. मोठय़ा कालावधीनंतर मिळालेली मासळी पाहून मच्छीमार आनंदाने आश्चर्यचकित झाले आहेत. आम्ही आज किमान अंदाजे पाच टन मासे पकडण्यात यशस्वी झालो आहोत, पण ही दुर्मिळ घटनांकैकी एक घटना आहे. जवळपास कित्येक वर्षांच्या कालावधीनंतर ही मासळी बंपर मासळी मिळाल्याने आम्ही सर्वच आनंदात आहोत, असे मत मिठमुंबरी खालचीवाडी रापण संघातील मच्छीमारांनी व्यक्त केले.

खऱया अर्थाने दिवाळीनंतर पारंपरिक रापण मासेमारीला सुरुवात होते, मात्र हंगाम सुरू झाल्यापासून एकदाही म्हणावीत अशी मासळी मिळत नव्हती आणि त्यातून रोजगारदेखील उपलब्ध होत नसल्यामुळे मच्छीमारांनी 9 जानेवारी रोजी आपला पारंपरिक व्यवसाय बंद केला. गेल्या दहा दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात मिठमुंबरी समुद्रकिनारी मासळी असल्याचे बोलले जात होते तसेच यावेळी आंबा हंगामदेखील अडचणीत असल्यामुळे मच्छीमारांनी आपली नौका 13 मार्च रोजी पुन्हा समुद्रात ढकलली. गेले सात ते आठ दिवस सातत्याने ही मासळी मोठय़ा प्रमाणात दिसत होती, परंतु जाळ्याला मिळत नव्हती. अखेर शेवटी 22 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता पुन्हा नौका समुद्रात ढकलली आणि रापण ओढण्यास सुरुवात केली असता यामध्ये बंपर प्रमाणात कोकर जातीचा मासा आढळला.