
आयपीएलच्या नव्या मोसमात संजू सॅमसनच्या आगमनानंतर चेन्नई सुपर किंग्समध्ये (सीएसके) सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला होता तो म्हणजे यष्टिरक्षणाची जबाबदारी नेमकी कोणाकडे जाणार? महेंद्रसिंग धोनी की संजू सॅमसन? आता या प्रश्नाचे उत्तर जवळपास स्पष्ट होताना दिसतेय. सीएसकेचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आपल्या एका पोस्टमध्ये सॅमसन फिल्डिंगचा सराव करताना व्हिडीओ शेअर करत तो नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत दिले. या पोस्टमुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे.
अश्विनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सॅमसन फिल्डिंग कोच जेम्स फोस्टरसोबत मैदानात फिल्डिंगचा सराव करताना दिसतोय. विशेष म्हणजे, तो उंच झेल घेण्याचा सराव करत होता. या पोस्टसोबत अश्विननेच चाहत्यांना प्रश्न केला की हे संकेत आहेत का? जो प्रश्न साऱयांना पडलाय, त्याचे उत्तर देणारे हे दृश्य असल्याचे संकेत दिल्यामुळेच नव्या चर्चेला अक्षरशः उधाण आले.
आतापर्यंत अशी शक्यता व्यक्त केली जात होती की, आयपीएलमध्ये दाखल झाल्यानंतर सॅमसन यष्टिरक्षणच करेल आणि धोनी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून खेळू शकतो. मात्र, सॅमसनचा सध्याचा सराव पाहता चित्र उलट दिसू लागले आहे. तो यंदा क्षेत्ररक्षक म्हणून खेळण्याची शक्यता बळावत असून, धोनीच पुन्हा एकदा विकेटमागे संघाचे रक्षण करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सॅमसन हा केवळ यष्टिरक्षकच नाही, तर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने क्षेत्ररक्षणामध्ये आपली छाप सोडली आहे. टी-20 विश्वचषक 2026 मध्ये हिंदुस्थानला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने बजावलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती. त्यामुळे सीएसकेसाठी तो आता आघाडीच्या फलंदाजांमध्ये आणखी एक घातक शस्त्र ठरणार आहे.























































